पती, मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार | पुढारी

पती, मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीला आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी नितेश सिद्धाराम खणगावकर (रा. सांगवडे, ता. करवीर) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

संशयित गॅस सिलिंडर वितरक म्हणून काम करतो. या कामामुळे पीडित महिलेशी त्याची ओळख झाली. दि. 2 जानेवारी रोजी सायंकाळी संशयित पीडितेच्या घरी गेला. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. नकार दिल्यास स्वत: आत्महत्या करेन, अशी त्याने धमकी दिली. या प्रकारानंतर रात्री 11.30 वाजता संशयित पुन्हा पीडितेच्या घरी गेला. यावेळीही त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने घरातून बाहेर जाण्यास नकार देताच पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. संशयिताने त्याच रात्री पीडितेला जामसंडे (ता. देवगड) येथील दूधगंडे यांच्या भाड्याने घेतलेल्या खोलीत नेऊन ठेवले. धमकी व मारहाण करून वारंवार बलात्कार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button