कोल्हापूर : हनी ट्रॅपने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करणारे चौघे ताब्यात | पुढारी

कोल्हापूर : हनी ट्रॅपने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करणारे चौघे ताब्यात

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बड्या व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करून वर्षभरात दीड कोटीला लुटणार्‍या सराईत टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने मंगळवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलेे. पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांनी लोटांगण घालत गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. टोळीचा म्होरक्या अटकेच्या भीतीने पसार झाला आहे. शोधासाठी पोलिसांनी पहाटे काही ठिकाणी छापे टाकले.

हनी ट्रॅपमध्ये अडकवून शहरातील एका बड्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून संघटित टोळीतील सराईतांनी दीड कोटीला लुटल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध होताच शहरात प्रचंड खळबळ माजली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीही या वृत्ताची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषणसह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पहाटेपासून शोधमोहीम राबवून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यातील दहा ते बारा व्यावसायिकांची लुबाडणूक

लॉकडाऊन काळात संघटित टोळ्यांनी काही धनिकांसह वेगवेगळ्या घटकांतील मंडळींना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा धडाकाच लावला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या प्राथमिक चौकशीत गुन्हेगारी टोळ्यांनी शहरासह ग्रामीण भागातील दहा ते बारा बड्या व्यावसायिकांसह कॉलेज तरुणांना लाखो रुपयांना लुटल्याची माहिती पुढे येत असल्याचे सांगण्यात आले.

‘मोकां’तर्गत कारवाई शक्य!

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी पुन्हा पत्रकारांशी बोलताना फसगत झालेल्या मंडळींनी पोलिस ठाण्यांशी संपर्क साधून तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन केले आहे. तक्रारदार व्यक्तीच्या नावाबाबत गोपनीयतेची खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्लॅकमेल करून लुबाडणूक करणार्‍या टोळ्यांविरुद्ध प्रसंगी ‘मोकां’तर्गत कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Back to top button