चंदगड; पुढारी वृत्तसेवा : ढोलगरवाडी एमडी ड्रग्ज प्रकरण मधील मुख्य संशयित वकील राजकुमार राजहंस व त्याचा केअर टेकर निखिल लोहार याला अटक झाल्यानंतर अधिक तपासासाठी पोलिसांनी त्यांच्यासह ढोलगरवाडी ड्रग्ज फॅक्टरी तसेच त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. तसेच तीन वर्षांपूर्वीही ताम्रपर्णी नदीवरील माणगावच्या बंधार्यानजीक असलेल्या मृत सुधीर पाटील यांच्या मालकीच्या पोल्ट्री शेडस्ची गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पाहणी केली. तपास अपूर्ण राहिल्याने पथक वस्तीला राहणार असल्याचे समजते.
ढोलगरवाडी एमडी ड्रग्ज प्रकरण राज्यासह देशात चंदगड तालुक्याची नाचक्की झाली. तालुक्यातील अन्य ठिकाणीही पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले.
ड्रग्ज बनवण्यासंबंधीत तालुक्यातील इतर काही ठिकाणी सर्च ऑपरेशन करून परिस्थितीजन्य पुरावे एकत्र करण्यासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागातील अमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी पथक आरोपी राजहंस व लोहार यांना घेऊन ढोलगरवाडी येेेथील फार्म हाऊसवर आले होते. यावेळी लोहारच्या घराचीही पाहणी केली. तसेच बेळगाव येथील राजहंस याच्या घराची तपासणी केली जाणार असल्याचे एका अधिकार्याने सांगितले.
दरम्यान, ढोलगरवाडी येथील फार्म हाऊसचा केअरटेकर निखिल लोहार तसेच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड वकील राजकुमार राजहंस याला घेऊन मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा चंदगड तालुका गाठला. संशयितांना घेऊन ड्रग्ज बनवण्यासंबंधी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचे काम केले जाणार असल्याचे समजते. यामध्ये संशयितांविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून केअरटेकर निखिल लोहार व राजकुमार राजहंस यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी बसर्गे हद्दीतील एका पोल्ट्री फार्मवर कारवाई करून सील करण्यात आले होते. दोघांना घेऊन पोलिस अन्य धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यात यापूर्वीही झाली होती ड्रग्जविरोधी कारवाई ( ढोलगरवाडी एमडी ड्रग्ज प्रकरण )
दोन वर्षांपूर्वी ड्रग्ज प्रकरणातील अटक करण्यात आलेला रॉकी नावाचा आरोपी सध्या मुंबई कारागृहात आहे. कारवाईनंतर माणगाव बंधार्यावरील पोल्ट्री फार्म सील करण्यात आले होते. मात्र या प्रकरणाची कुठेही वाच्यता झाली नव्हती. या प्रकरणाचा ढोलगरवाडी ड्रग्ज प्रकरणाशी काही संबंध आहे का, त्याद़ृष्टीने तपास केला जाणार असल्याचे समजते. याबाबत आजही पोलिसांनी मौन पाळले.