कोल्हापूर : मोठ्या व्याजाच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा! | पुढारी

कोल्हापूर : मोठ्या व्याजाच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा!

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : शासन व्यवस्थेने डोळ्याला झापड बांधून, कान बंद केले, की समाजात लबाड कसे हैदोस घालतात, याचे उत्तम उदाहरण सध्या कोल्हापूर जिल्ह्यात अधिक व्याजाच्या आमिषाने सर्वसामान्यांच्या ठेवी गोळा करणार्‍या संस्थांच्या रूपाने समोर आले आहे. संबंधित संस्थांचे व्यवहार संशयास्पद आहेत. बँकिंगद़ृष्ट्या व्यवहार्य नाहीत.

यामुळे नागरिकांची लुबाडणूक होण्याचाच धोका अधिक असे दैनिक ‘पुढारी’ने वारंवार निदर्शनास आणून दिले, तरीही शासन व्यवस्थेनेच कानाडोळा केल्याने कोल्हापुरात नागरिकांची अव्याहतपणे लुबाडणूक सुरू आहे. याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातून जादा व्याजाच्या आमिषापोटी झालेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडचणीत सापडण्याचा धोका अधिक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जादा व्याजाच्या परताव्यापोटी नागरिकांकडून ठेवी गोळा करण्याचा धंदा गेले काही वर्षे बेधडकपणे सुरू आहे. यामध्ये ठेवी गोळा करण्यासाठी तरुणांना मोठा पगार, आकर्षक लाभाचे प्रलोभन दाखवून त्यांना या जाळ्यात ओढले जाते आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लबाडांची टोळी मोठी माया जमविते.

या धंद्यात शेअर बाजारातील गुंतवणुकीआधारे महिन्याला 8 टक्के या दराने वार्षिक 98 टक्क्यांचा परतावा दिला जाईल, असे सांगून सर्वसामान्यांच्या ठेवी गोळा केल्या जातात. त्यांचा विश्वास बसण्यासाठी व्याजाचे काही महिन्यांचे धनादेशही त्यांना दिले जातात. त्याशिवाय हे धनादेश बाऊन्स न करण्याची खबरदारी घेऊन गुंतवणूकदारांचा योजनेवरील विश्वास द़ृढ करण्यात ही टोळी माहीर आहे.

या आमिषाला केवळ सर्वसामान्य नागरिक नव्हे, तर समाजातील प्रतिष्ठित समजले जाणारे डॉक्टर्स, वकील, शिक्षक, प्राध्यापकही बळी पडले आहेत. यातील काही जणांनी तर आपले व्यवसाय सोडून योजनेला गुंतवणूकदार मिळविण्याचा धंदा सुरू केला आहे आणि योजनेचे विपणन व्यवस्थेतील कर्मचार्‍यांची मर्सिडीससारख्या आलिशान गाड्यांतून फिरण्यापर्यंतही मजल गेली आहे.

कोल्हापुरात राजरोस सुरू असलेल्या या धंद्याचा पर्दाफाश दैनिक ‘पुढारी’ने जून महिन्याच्या प्रारंभीच केला होता. त्याची पाळेमुळे वेळीच खणून काढली असती, तर लबाड गजाआड गेले असते. शिवाय कोट्यवधी रुपयांची गुंतवणूकही झाली नसती; पण अलीकडे शासन व्यवस्थेला फिर्याद लागते आणि मोठी गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार निराळ्याच चौकशीच्या भीतीने फिर्याद देण्यास तयार नाहीत. यामुळे सध्या तरी लबाडांचे फावले आहे. खरे तर पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देऊन तपास करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु, यामध्ये पुढाकार कोण घेणार, हाच खरा कळीचा मुद्दा आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दै. ‘पुढारी’चे हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कोल्हापुरातील अतिदक्ष समाजसेवकांनी (फाळकूटदादा) याप्रश्नी लक्ष घातल्याचे आणि त्यांनी या लबाडांच्या म्होरक्याला जाबही विचारल्याचे समजते; पण हात ओले झाल्यानंतर या जागरुक समाजसेवकांचे समाधान झाले आणि लबाडांनी पुन्हा उचल खाल्ल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. शासन व्यवस्थेची डोळेझाक आणि तथाकथित समाजसेवकांचा चोरावर मोर होण्याच्या या प्रकाराने मात्र सध्या कोल्हापुरात लबाडांना रान मोकळे झाले आहे.

कष्टापेक्षा सहज मिळणार्‍या जादा पैशाचा मोह

कष्टाने मिळविण्यापेक्षा सहज मिळणार्‍या जादा पैशाचा मोह आवरत नाही, असे हे प्रकरण आहे. या मार्गातून होणार्‍या लबाडणुकीविषयी नागरिकांना प्रसार माध्यमातून याविषयी वेळोवेळी जागरूक केले. परंतु, अधिक परताव्याच्या मोहापायी कोल्हापुरात व्यक्तीगत 40-50 लाखांपर्यंत गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा एकत्रित आकडा काहीशे कोटींच्या घरात आहे. यामध्ये अतिमोहापायी काहींनी हातातल्या नोकर्‍या सोडून या गुंतवणुकीचा मार्ग पसंत केला आहे.

यातून लबाडांची गंगाजळी दिवसेंदिवस वाढते आहे आणि शासन व्यवस्थेचा धाकच संपल्याने लबाड मात्र अधिक गलेलठ्ठ होताना दिसताहेत. अशांना सुतासारखे सरळ करण्याची धमक शासन व्यवस्थेत आहे. कायद्यातही तरतुदी आहेत. पण व्यवस्थेचे बंद डोळे, बंद कान उघडणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.

Back to top button