कोल्हापूर : मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचा अंत! पुत्रवियोगामुळे पित्याचीही प्रकृती अत्यवस्थ | पुढारी

कोल्हापूर : मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचा अंत! पुत्रवियोगामुळे पित्याचीही प्रकृती अत्यवस्थ

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या 30 वर्षांचा धडधाकट तरुण. रात्री कामावरून आला. जेवण करून दारासमोर गप्पा मारत बसला. बोलता बोलता भोवळ आली. खाली कोसळला. आरडाओरडा सुरू झाला. एकुलत्या मुलाची अवस्था बघून रडता रडताच आई बेशुद्ध पडली. नागरिकांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच माय-लेकाचा मृत्यू झाला. पत्नी व मुलाच्या निधनाचा वडिलांनाही धक्का बसला. त्यांचीही प्रकृती अत्यवस्थ बनली. ही हृदयद्रावक घटना येथील पुजारी मळा परिसरात घडली.

प्रीतम दादासो तेरदाळे (वय 30) व सौ. शोभा दादासो तेरदाळे (54) अशी माय-लेकाची नावे असून, दादासो तेरदाळे असे वडिलांचे नाव आहे. येथील पुजारी मळा परिसरात तेरदाळे कुटुंबीय राहतात. मंगळवारी रात्री कामावरून परतल्यानंतर प्रीतम जेवण आटोपून दारासमोर गप्पा मारत बसला होता. अचानक त्याला भोवळ आली. त्यातच हृदयविकाराचा तीव— झटका आला आणि तो कोसळला. कुटुंबीयांनी केलेला आरडाओरडा ऐकून भागातील नागरिकांनी तेरदाळे यांच्या घराकडे धाव घेतली. आई शोभा यांच्यासमोरच ही घटना घडल्याने त्यांनी आक्रोश सुरू केला. रडता रडताच त्यांनाही भोवळ आली. नागरिकांनी प्रथम प्रीतमला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पाठोपाठ शोभा यांचीही प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी आई व मुलाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

पत्नी व मुलाचे निधन झाल्याचे समजताच दादासो तेरदाळे यांची प्रकृतीही अत्यवस्थ बनली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या काही क्षणात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. शवविच्छेदनानंतर दोघांंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. प्रीतमच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

परिसरात हळहळ

प्रीतम हा इंजिनिअर होता. लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीमध्ये तो नोकरीस होता. भागातील तिरंगा नवरात्रौत्सव मंडळाचा तो कार्यकर्ता होता. प्रीतम व त्यांची आई मनमिळाऊ स्वभावाचे होते. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button