Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मतदार घटले | पुढारी

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मतदार घटले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील मतदार संख्येत 7 हजार 448 इतकी घट झाली. जिल्ह्याची अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. मतदार यादीत नव्याने 62 हजार 676 मतदारांची नाव नोंदणी झाली, तर 77 हजार 466 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांचा टक्का मात्र यावर्षी वाढल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. यावर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांसाठी ही मतदार यादी वापरली जाणार आहे. यामुळे मतदारांनी आपले नाव यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहनही उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले. (Kolhapur News)

ऑक्टोबर 2023 मध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. दि.22 जानेवारीपर्यंत 62,676 मतदारांची नाव नोंदणी झाली, तर 77,466 मतदारांची नावे वगळली. यामुळे जिल्ह्यातील अंतिम मतदार यादीत 14,790 मतदारांची घट झाली. जिल्ह्याची मतदार संख्या 31,42,598 इतकी झाली असून, त्यात 16,01,877 पुरुष, तर 15,40,522 महिला आणि 169 तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे. जिल्ह्यात 8,960 सैनिकी मतदार आहेत. (Kolhapur News)

77 हजार 466 मतदारांची नावे वगळली

जुलै ते ऑगस्ट 2023 मध्ये घरोघरी झालेल्या सर्वेक्षणातून मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित व दुबार अशा 77 हजार 466 मतदारांची नावे वगळली. 52,862 मृत मतदारांपैकी 80 पेक्षा अधिक वयाचे 16,484 , मतदार यादीतील 19,728 एकसारखे फोटो असलेल्या मतदारांपैकी सखोल तपासणीनंतर 5,861 तर नाव व इतर काही तपशील समान असलेल्या 13,123 मतदारांपैकी 1,561 मतदारांची नावे वगळली. यासह स्थलांतरीत मतदारांची नावे वगळली आहेत.

नवमतदारांचा टक्का वाढला

जिल्ह्यात 18 ते 19 या वयोगटातील नव मतदारांचा टक्का वाढला. या वयोगटात 21,915 मतदारांची नव्याने भर पडली.प्रारूप यादीत 13,247 (0.42 टक्के) मतदार होते, अंतिम यादीत ते 35,162 (1.12 टक्के) इतके झाले. 20 ते 29 या वयोगटात 20,306 मतदार वाढले. प्रारूप यादीत 5,45,715 (17.28 टक्के) होते, अंतिम यादीत ते 5,60,021 (18.01 टक्के) इतके झाले. महाविदयालय शिबिरात 5,251 विदयार्थ्यांनी नोंदणी केली. (Kolhapur News)

महिला मतदारांचे प्रमाण वाढले

महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्याने महिला मतदार नोंदणी प्रमाण वाढले. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 962 इतके झाले. गतवर्षी हे 952 तर प्रारूप यादीत ते 957 इतके होते.

सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर

सर्व 3359 मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवली जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राला रॅम्प केला जाणार आहे. जिल्हयात एकूण 24,440 इतके दिव्यांग मतदार आहेत.

अजूनही करता येणार नोंदणी

अंतिम यादीनंतरही मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू आहे. यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या युवा मतदारांना नोंदणी करता येणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

7 हजार 448 मतदार झाले कमी

जिल्ह्यात गतवर्षी मतदार संख्या 31 लाख 50 हजार 46 इतकी होती. यावर्षी ती 31 लाख 42 हजार 598 इतकी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 7 हजार 448 मतदार कमी झाले.

Back to top button