कोल्हापूर : निवडणूक प्रचाराचा हायटेक फंडा | पुढारी

कोल्हापूर : निवडणूक प्रचाराचा हायटेक फंडा

आशिष शिंदे

कोल्हापूर : जंगी जाहीर सभा, गल्लोगल्ली निघणार्‍या मिरवणुका, पदयात्रा, युवक आणि महिलांचे मेळावे, बालगोपालांचा मेळा; या सार्‍यांतून होणारा निवडणूक प्रचार थोडासा मागे पडला असून आता त्याची जागा डिजिटलने घेतली आहे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर प्रचाराचा मारा करण्यासाठी राजकीय पक्षांसह नेत्यांच्या फौजा सज्ज झाल्या आहेत. राजकारणातील दिग्गजांनी आपल्या प्रचार-प्रसारासाठी आयटी प्रोफेशनल्सचे साहाय्य घेऊन राज्यातील प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदार संघात वॉर रूम्स तयार केल्या आहेत. एका क्लिकवर मतदार संघातील लाखो मतदारांपर्यंत या वॉर रूममधून राजकीय पक्ष आणि नेते आपला अजेंडा पोहोचवत आहेत.

राज्यात सुमारे 7 कोटी 20 लाख 63 हजार मोबाईल इंटरनेट वापरकर्ते आहेत. याच डिजिटल तंत्राचा फायदा घेत राजकारण्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा माहोलच बदलून टाकला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रत्येक टीकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी, आपले संदेश, अजेंडा वॉर रूमच्या माध्यमातून व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, यूट्यूबद्वारे मतदार संघातील लाखो मतदारांपर्यंत पोहोचविला जात आहे. वॉर रूममधून प्रामुख्याने व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबच्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार करण्याची संपूर्ण रणनीती ठरवली जाते. यानंतर आपले संदेश लोकांच्या मनात बिंबवणे, विरोधी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर पोस्टच्या माध्यमातून देण्याचे काम केले जाते.

अगदी व्हिडीओ तयार करणे, पोस्टर तयार करणे, डॉक्युमेंटरी तयार करणे अशी कामे येथून केली जातात. यासाठी वॉर रूमप्रमुख, कंटेट रायटर, व्हिडीओ इडिटर, कॅमेरामनची टीम तैनात असते. प्रत्येक मतदार संघात वॉर रूम उभारण्याची जबाबदारी आमदार, खासदरांवर दिली आहे. तसेच जिथे आपल्या पक्षाचा आमदार नाही तिथे निवडणूक प्रमुखावर जबाबदारी आहे. जिल्ह्यात कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदार संघांत वॉर रूम्स तयार करण्यात आल्या आहेत. तसेच विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, आजरा-चंदगड, हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी, राधानगरी-भुदरगड, शाहूवाडी या मतदार संघांतही वॉर रूम्स तयार आहेत.

व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार

एका वॉर रूमच्या कक्षेत सुमारे 600 ते 700 व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. एक ग्रुपमध्ये सुमारे 900 ते हजार सदस्य असतात. यामुळे एका क्षणात पाच ते सहा लाख मतदारांच्या व्हॉटस् अपवर आपले संदेश, पोस्ट, व्हिडीओ, ऑडिओंचा भडिमार या वॉर रूममधून होणार आहे.

वॉर रूमसाठी तयार केलीय नियमावली

वॉर रूम उभारण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रदेश कार्यालयाकडून मार्गदर्शक नियमावली करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट असावी, किती संगणक असावेत, कोणते सॉफ्टवेअर असावेत; याशिवाय कोणता कॅमेरा वापरावा, कशा पोस्ट असाव्यात याचा समावेश या नियमावलीत आहे.

प्रदेशाध्यक्षांकडून वॉर रूमवर नजर

प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील वॉर रूमवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महिन्यातून दोनवेळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वॉर रूम प्रमुखांची बैठक घेतली जाते व पक्षाचा अजेंडा सेट केला जातो.

Back to top button