सहस्र दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट | पुढारी

सहस्र दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्री राम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने छत्रपती कुटुंबीयांतर्फे पंचगंगा घाटावर नदीची महाआरती करण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी प्रज्वलित केलेल्या सहस्र दिव्यांनी पंचगंगा घाट उजळून निघाला. यावेळी उपस्थितांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. दीपोत्सवासह फटाक्यांच्या आतषबाजीने पंचगंगा घाट परिसर प्रकाशात न्हाऊन निघाला.

सायंकाळनंतर पंचगंगा घाटावर रामभक्तांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली. पंचगंगा आरती भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाआरतीची तयारी केली होती. सायंकाळी सात वाजता छत्रपती घराण्यातील याज्ञसेनीराजे, संभाजीराजे, संयोगिताराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशराजराजे यांचे आगमन झाले. या सर्वांच्या हस्ते प्रथम पंचगंगा नदीची आरती करण्यात आली. यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कृष्णाची आरतीही करण्यात आली. महाआरतीपूर्वी पंचगंगा घाटावर सहस्र पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. घाटाच्या प्रत्येक पायरीवर लावलेल्या पणत्यांमुळे घाटावर विलोभनीय द़ृश्य निर्माण झाले होते. दीपोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती. दीपोत्सव व आतषबाजीने पंचगंगा घाट परिसर प्रकाशात न्हाऊन निघाला. यावेळी ‘जय श्री राम’च्या घोषणांनी पंचगंगा घाट दुमदुमून गेला.

यावेळी व्हाईट आर्मीचे जवान, एनसीसीचे विद्यार्थ्यांसह पंचगंगा आरती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कुंभार, सुधाकर भांदिगरे, दिलीप कोळी, माणिकलाल विभूते, कृष्णात पाटील, श्रीकांत कुंभोजे, अमोल पाटील महाआरतीस उपस्थित होते; तर दीपोत्सवावेळी शारंगधर देशमुख, मधुकर रामणे, संजय मोहिते, राजाराम गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दीपोत्सवानंतर उपस्थितांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली.

Back to top button