कोल्हापूर : लॉज मालकाच्या खुनातील पिस्तूल मध्य प्रदेशातून खरेदी केल्याचे निष्पन्न | पुढारी

कोल्हापूर : लॉज मालकाच्या खुनातील पिस्तूल मध्य प्रदेशातून खरेदी केल्याचे निष्पन्न

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दोनवडे (ता. करवीर) येथील लॉजमालक चंद्रकांत पाटील यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेले गावठी पिस्तूल दोन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील धार येथून 25 हजार रुपयांमध्ये खरेदी केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या चौकशीत उघड झाले आहे. पोलिसांचे विशेष पथकही रवाना करण्यात आले आहे.

मुख्य संशयित हल्लेखोर दत्तात्रय पाटील याने पिस्तूलचा व्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे. आर्थिक वादातून मुख्य संशयित दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांनी शनिवारी ( दि. 13) रात्री लॉजमालक चंद्रकांत पाटील यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. प्रतिकाराचा प्रयत्न करणारा त्यांचा मुलगा रितेश (वय 21) याच्यावरही गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पिस्तूल लॉक झाल्याने तो बचावला. गुन्ह्याची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे तपास सोपविला आहे.

पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व पथक तपासात सक्रिय आहेत. पोलिसांनी हल्लेखोराकडून गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे. मात्र, पिस्तूल कोणाकडून खरेदी करण्यात आले, त्यावर वेगवेगळी चर्चा होती. दत्तात्रय पाटील याने दोन महिन्यांपूर्वी पिस्तूल खरेदी केले होते. शस्त्र परवाना असल्याचा बहाणा करून कमरेला लावूनच तो दोनवडेसह परिसरात फिरत होता. लॉज मालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात आणखी काही जणांवर सहआरोपी म्हणून कारवाई होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Back to top button