कोल्हापुरात अवतरले ‘रामराज्य’ | पुढारी

कोल्हापुरात अवतरले ‘रामराज्य’

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील राम मंदिरामध्ये सोमवारी रामलल्ला प्रतिष्ठापना होत आहे. करवीरनगरीतही रामराज्य अवतरल्याचा अनुभव येत आहे. श्रीरामाच्या प्रतिकृती, पतका, शोभायात्रांनी अवघे शहर राममय बनले आहे. सोमवारीही पहाटेपासून मंदिरे, विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या वतीने धार्मिक विधी, होमहवन, महासंकल्प, पंचगंगा नदीची महाआरती, आतषबाजीने रामलल्ला प्रतिष्ठापनेचा आनंदोत्सव साजरा होणार आहे.

सोमवारी सकाळी 9 ते रात्री 10 यावेळेत शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत. दसरा चौक येथे उभारण्यात आलेल्या 108 फुटी रामप्रभू प्रतिकृतीसमोर सकाळी 9 वाजता श्रीराम पट्टभिषेक व महाप्रसादाचे वाटप होईल. दुपारी भजनाचा कार्यक्रम, दुपारी 4.30 नंतर श्रीराम स्तोत्र व हनुमानचालिसा पठण होणार आहे. सायंकाळी 7 वाजता महाआरती व कारसेवकांचा सत्कार करण्यात येईल. रात्री 7.30 नंतर आतषबाजी व रात्री 8 वाजता गीत रामायण कार्यक्रम होणार आहे.

अंबाबाई मंदिरातील राम मंदिरामध्ये शाहू महाराजांच्या हस्ते सोमवारी सकाळी 8 वाजता अभिषेक, पूजा व आरती होणार आहे. यावेळी माजी खासदार संभाजीराजे व माजी आमदार मालोजीराजे उपस्थित राहणार आहेत. होमहवन, आरती आणि प्रसादाचे वाटप होईल. सायंकाळी 6 वा. पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सव आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. 25 हजार दिव्यांसह लेसर शो होणार आहे.

कलशपूजन कार्यक्रम

मार्केट यार्ड येथील स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ, प्रज्ञापुरीच्या वतीने सोमवारी रामजन्मभूमी कलशपूजन कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 वाजता स्वर स्तोत्र पठण, दुपारी 12.15 वाजता आरती, अक्षता अर्पण आणि प्रसाद वाटप, तर सायंकाळनंतर भजनाचा कार्यक्रम होणार.

राजाराम बंधारा येथे हवन

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त कसबा बावडा येथील राजाराम बंधारा परिसरातील दत्त मंदिर घाटावर हवन करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. 22) दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 वेळेत हा विधी होणार आहे.

बालस्केटिंगपटूंचा अडीच तास स्केटिंगचा संकल्प

बालस्केटिंगपटूंच्या वतीने सोमवारी शोभायात्रेद्वारे सलग अडीच तास स्केटिंगचा संकल्प करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्र व शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मार्केट यार्ड येथे विठ्ठल-रुक्माई मंदिरासमोर सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Back to top button