कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान एजंटांसह रॅकेटचा सुळसुळाट | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान एजंटांसह रॅकेटचा सुळसुळाट

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वंशाला दिवा मुलगाच हवा, या हट्टापायी जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि स्त्री भू्रणहत्या करणार्‍या सक्रिय टोळ्यांचा सुळसुळाट सुरू आहे. जानेवारी 2023 मध्ये राधानगरी, भुदरगड, करवीर तालुक्यात तीन टोळ्यांना तुरुंगाची हवा दाखविण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. ग्रामीण भागात चालणार्‍या या कृत्यांचे लोण शहरी भागातही पसरले असून गर्भलिंग निदान करणार्‍या एजंटांसह रॅकेट सुसाट आहे.

देशात सर्वाधिक मुलींचे प्रमाण कमी असणारा पन्हाळा तालुका आहे. त्यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढओ’चा नारा देत नानाविध प्रकारच्या योजना राबविणार्‍या शासनालाच या टोळ्यांनी खुले आव्हान दिले आहेत. ज्या प्रमाणात गर्भलिंग निदान होत आहे. त्या तुलनेत केली जाणारी कारवाई प्रातिनिधिक स्वरूपातील आहे.

जिल्ह्यात स्त्री जन्मदराचे सरासरी प्रमाण हे 1000 मुलांमागे 925 इतके आहे. पन्हाळा तालुक्यात हेच प्रमाण केवळ 873 इतके आहे. गेल्या काही वर्षांत गर्भलिंग निदान करणे आणि स्त्री भू्रणहत्या करणारे रॅकेट वाढले आहे. यामध्ये काही बोगस डॉक्टर आणि त्यांना कनेक्ट असणारे एजंट दलालांचा पदार्फाश करण्यात आरोग्य विभागाच्या टीमला यश आले आहे. एकेका सोनोग्राफी सेंटरकडे डझन, दोन डझन एजंट कनेक्ट असल्याने मोठ्या प्रमाणात स्त्री भ्रूणहत्या होत आहेत.

हे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण विभाग आणि शहरी विभाग अशा दोन समित्या शासनाने स्थापन केल्या आहेत. एक समिती जिल्हाधिकारी, तर दुसरी समिती महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असते. या समितीपैकी जिल्हा आरोग्य विभागाने 2008 पासून आतार्यंत 16 वर्षांत 21 ठिकाणी खटले दाखल केले आहेत.

समित्या सुस्तच

ग्रामीण भागात पोलिसपाटील, ग्रामसेवक, सरपंच, महिला संघटनांनी, तर शहरातील सामाजिक संघटना, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी जागरूक असणे गरजेचे आहे. सर्वांच्या प्रयत्नातून या प्रकारांना आळा घालणे शक्य होणार आहे.

Back to top button