अंगणवाडी कर्मचारी संघ मंगळवारी महामार्ग रोखणार | पुढारी

अंगणवाडी कर्मचारी संघ मंगळवारी महामार्ग रोखणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.23) कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने संपाची तिव—ता वाढविण्यात येणार असून, दि. 24 जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. गुरुवारी संपाचा 46 वा दिवस होता.

अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांनी दि. 4 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. 46 व्या दिवशीदेखील संप सुरूच राहिला. कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी मंगळवारी महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. दि. 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळाने भरीव निधी, पेन्शन, ग्रॅच्युएटीच्या निर्णयाबाबत कृती समितीला लेखी काहीच कळविले नाही.

घंटानाद मोर्चा काढणार

अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांचे आंदोलन अधिक तीव— करण्यात येणार असल्याचे आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य बालवाडी, अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे व सचिव शुभांगी पाटील यांनी सांगितले. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी मुबंईत संयुक्त बैठक बोलविण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप त्याबाबत काही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

दि.24 जानेवारीला मुंबईत मोर्चा

अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या संपाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. 24 जानेवारी रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आप्पा पाटील व जयश्री पाटील यांनी केले आहे.

Back to top button