लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता : सतेज पाटील | पुढारी

लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता : सतेज पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी होणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत 400 पार म्हणत असले तरी 400 पार की 200 पार हे जनता ठरविणार आहे. आत्मविश्वास गमाविला असल्यामुळेच भाजप बहुमत असतानादेखील पक्ष फोडत असल्याचा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी गुरुवारी केला.

आ. पाटील यांच्यासह काँग्रेसचे आमदार व पदाधिकार्‍यांनी गुरुवारी ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहिला. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपची प्रतिमा चांगली आहे तर त्यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कारभारावर निवडणूक लढविणे अपेक्षित आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. अजूनही पक्ष फोडण्याची वेळ त्यांच्यावर का येते? सुशीलकुमार शिंदे व त्यांचे कुटुंब गेल्या 50 वर्षांपासून काँग्रेससोबत आहेत. याबाबत त्यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. त्यांना टार्गेट केले जात आहे, त्याचा आपण निषेध करतो, असे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

काँग्रेस एकसंघ आहे. ती यापुढेही एकसंघ राहील, असे सांगून आ. पाटील यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच चित्र स्पष्ट होईल, असेही सांगितले. यावेळी आमदार ॠतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

…अन् आ. सतेज पाटील भाऊक झाले

सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात ‘सत्यशोधक’ चित्रपट समाजाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहताना आमदार पाटील हे काही वेळ भाऊक झाले होते. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा असलेला ‘सत्यशोधक’ चित्रपट आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या सर्व आमदारांनी शाहू टॉकीजमध्ये गुरुवारी दुपारी 3 चा शो पाहिला. त्यांच्यासोबत आमदार ॠतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव आणि काँग्रेसचे पदाधिकारी होते.

Back to top button