मुलींचा जन्म दर घटला; 7 जिल्हे ‘डेंजर झोन’मध्ये! | पुढारी

मुलींचा जन्म दर घटला; 7 जिल्हे ‘डेंजर झोन’मध्ये!

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यातील मुलींचा जन्म दर दिवसेंदिवस घटत चालला आहे. त्याचे हादरे परंपरागत कुटुंब व्यवस्थेला बसू लागले आहेत. मुलींच्या जन्म दराच्या बाबतीत खान्देश आणि मराठवाड्याची अवस्था अजूनही शोचनीयच आहे. पश्चिम महाराष्ट्रातही ही आकडेवारी चिंताजनक पातळीपर्यंत खालावलेली दिसत आहे.

2011 साली देशातील दरहजारी मुलींचे प्रमाण केवळ 943 इतकेच होते; पण केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या गेल्या दशकभरातील अथक प्रयत्नांमुळे देशभरातील दरहजारी मुलींचा सरासरी जन्म दर हा सध्या 1020 पर्यंत वाढलेला आहे. मात्र, याबाबतीत राज्याची वाटचाल जणूकाही उलट्या दिशेने सुरू आहे. दिवसेंदिवस दरहजारी मुलींचे प्रमाण घटतच चालले आहे. सध्या राज्यातील दरहजारी मुलींचे प्रमाण केवळ 929 इतकेच आहे. बहुतांश जाती-धर्मातील दरहजारी मुलींच्या जन्माचे प्रमाण थोड्याफार फरकाने याच पातळीवर आहे. त्यामुळे सगळ्याच जाती-जमातीतील कुटुंब व्यवस्थेला हादरे बसताना दिसत आहेत.

वधू खरेदी करण्याची वेळ

जवळपास सगळ्याच समाजांत दरहजारी मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे लग्नाच्या बाजारात उपवर मुलींचा भाव साहजिकच आभाळाएवढा वधारला आहे. मुलीच्या आणि तिच्या पालकांच्या झाडून सगळ्या अपेक्षा पुर्‍या करणार्‍या उपवर मुलांनाच लग्नासाठी मुली मिळू शकतात, अशी सध्याची अवस्था आहे. या निकषात न बसणारी उपवर मुले आणि त्यांचे पालक वर्षानुवर्षे केवळ उपवर मुलींच्या घरांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. यामुळे वैतागलेल्या काही जणांकडून सीमावर्ती भागातील गरीब कुटुंबातील वधू चक्क खरेदी करून आणण्याचेही प्रकार घडू लागले आहेत.

जवळपास प्रत्येक समाजात, शहरात आणि खेड्यापाड्यात वधू-वर सूचक जमातीचे पीक जोमाने फोफावताना दिसत आहे. त्यांच्याकडून उपवर मुलांना आणि त्याच्या पालकांना गंडा घालण्याच्या शेकडो घटना रोज नव्याने चव्हाट्यावर येताना दिसत आहेत.
राज्यातील हजारो लग्नाळू मुलांना अपेक्षित उपवर मुलगी मिळत नसल्यामुळे अशा युवकांना मोठ्या प्रमाणात नैराश्याने घेरलेले दिसत आहे. असे हजारो तरुण व्यसनांच्या आणि गुन्हेगारीच्या मार्गाने वाटचाल करताना दिसत आहेत. राज्यातील मुलींचे प्रमाण घटू लागल्यामुळे कुटुंब व्यवस्थाच धोक्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे.

वयोमान 35-40; पण अजूनही बाशिंग गुडघ्यालाच!

राज्यातील जवळपास प्रत्येक समाजातील हजारो युवक आणि त्यांचे पालक गेल्या अनेक वर्षांपासून उपवर वधूच्या शोधात दाही दिशा धुंडाळताना दिसत आहेत. मात्र, लग्नाच्या बाजारात उपवर मुलींना मागणी जास्त आणि त्यांची संख्या कमी असल्यामुळे केवळ उपवर मुलीच नव्हे, तर तिच्या पालकांचाही भाव वधारला आहे. आता आताच कुठे स्वत:च्या पायावर उभा राहिलेल्या मुलांकडून गाडी, बंगला, शेती, लाखो रुपयांचा बँक बॅलेन्स, लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. साहजिकच, या अपेक्षा पुर्‍या करण्यात कमी पडणारे तरुण 35-40 वय झाले तरी अजूनही गुडघ्यालाच बाशिंग बांधून फिरत आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय दरहजारी मुलींचे प्रमाण!

रत्नागिरी-936, सिंधुदुर्ग-922, गोंदिया-956, सातारा-895, भंडारा-950, गडचिरोली-961, नंदुरबार-944, सांगली-867, चंद्रपूर-953, रायगड-935, कोल्हापूर-863. यवतमाळ-922, नागपूर-931, अमरावती-935, परभणी-884, वर्धा-919, अकोला-912, धुळे-898, नांदेड-910, हिंगोली-882, अहमदनगर-852, सोलापूर-883, जालना-870, बुलडाणा-855, नाशिक-890, वाशिम-863, लातूर-889, जळगाव-842, उस्मानाबाद-867, छत्रपती संभाजीनगर-858, बीड-807, पुणे-883, ठाणे-924, मुंबई उपनगरे-913 आणि बृहन्मुंबई-914 असा मुलींचा दरहजारी जन्म दर आहे.

Back to top button