कोल्हापूर विमानसेवा : मुंबई, बंगळूर मार्गावर नवी विमानसेवा | पुढारी

कोल्हापूर विमानसेवा : मुंबई, बंगळूर मार्गावर नवी विमानसेवा

कोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूर विमानसेवा आणखी विस्तारणार आहे. लवकरच कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-बंगळूर या मार्गावर नवी विमानसेवा सुरू होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

डिसेंबर 2018 पासून कोल्हापूर विमानतळावरून ( कोल्हापूर विमानसेवा ) ‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बंगळूर या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली. यानंतर कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरू आहे.

कोल्हापूर विमानतळावरील सर्वच मार्गावरील सेवेला प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे कोल्हापूर विमातनळावरून दिल्या जाणार्‍या प्रवासी सेवा आणखी विस्तारणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापूर-मुंबई व कोल्हापूर-बंगळूर या मार्गावर आणखी दोन नव्या सेवा सुरू होणार आहेत.

कोल्हापूर-बंगळूर आणि कोल्हापूर-मुंबई या मार्गावर सध्या दोन विमान कंपन्यांच्या सेवा सुरू आहेत. त्यात आता आणखी एका कंपनीची भर पडणार आहे. या दोन्ही मार्गावर नव्याने सुरू होणार्‍या सेवा मात्र ‘उडान’ योजनेंतर्गत नसतील. मात्र नियमित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीकडून या मार्गावरील सेवा सुरू केली जाणार असल्याने त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल असा प्रशासनाचा विश्वास आहे.

कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-बंगळूर या दोन्ही मार्गावरील सध्या सुरू असलेल्या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. सध्या मुंबई मार्गावरील सेवेत अनियमितता आहे. अनेकदा या मार्गावरील फ्लाईट रद्द होत असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. कोल्हापूर-बंगळूर मार्गावरील नियमित असणारी विमानसेवाही कोरोना कालावधीनंतर आठवड्यातून चार दिवस केली आहे. या दोन्ही मार्गावरील नियमित सेवेची मागणी प्रवाशांतून सातत्याने होत आहे. यामुळे या मार्गावर भविष्यात आणखी सेवा वाढवण्याचीही शक्यता आहे.

सध्या या मार्गावरील सेवा सुरू करण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याबाबची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. येत्या महिना – दीड महिन्यात ही सेवा प्रत्यक्ष सुरू होईल, अशी परिस्थिती आहे.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवडाभर ठप्पच ( कोल्हापूर विमानसेवा )

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या मार्गावरील विमानसेवा या आठवड्यातही ठप्पच राहणार आहे. या आठवड्यातील तीनही दिवस या मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. दि. 30 नोव्हेंबरपासूनचे मात्र नियमित बुकिंग उपलब्ध आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशी आठवड्यातून तीन दिवस सेवा आहे. आठवड्यातून तीन वेळा आणि दुपारची वेळ असूनही या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी संख्या चांगली असतानाही या मार्गावरील विमानसेवा वारंवार खंडित होत आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत तांत्रिक कारणास्तव फ्लाईट रद्द होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत.

बेळगावचा घ्यावा लागतोे आधार

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेच्या अनियमिततेमुळे प्रवाशांना बेळगाव विमानतळाचा आधार घ्यावा लागत आहे. बेळगाव येथून सकाळी व सायंकाळी अशा दोन फ्लाईट मुंबईसाठी आहेत. यामुळे मुंबईसाठी ये-जा करणारे बेळगावकडे वळल्याचे चित्र आहे.

…अन्य मार्गावरील सेवा सुरळीत 

कोल्हापुरातून हैदराबाद, तिरुपती, बंगळूर या मार्गावर सध्या सेवा सुरू आहेत. हैदराबादला तर दररोज दोन फ्लाईट आहेत. या तीनही मार्गावरील सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावरील सेवाही सुरळीत सुरू आहेत.

Back to top button