कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटी मिळू नयेत म्हणून एका नेत्याचे प्रयत्न | पुढारी

कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटी मिळू नयेत म्हणून एका नेत्याचे प्रयत्न

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील रस्ते अत्यंत खराब असल्याने तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निधीसाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती, मात्र शहरातील एका नेत्याने केवळ स्वतःला श्रेय मिळावे म्हणून दोनवेळा विरोध केला. सगळे मीच करतोय हे दाखविणे दुर्दैवी आहे. त्यामुळे निधी मिळण्यास विलंब झाला. तिसर्‍यांदा मी जिद्दीला पेटलो. त्यानंतर मंत्री शिंदे यांनी रस्त्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला, असा गौप्यस्फोट राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात 100 कोटींच्या रस्ते कामांना मंगळवारी प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आ. जयश्री जाधव, सुजित चव्हाण, सत्यजित जाधव, राजू लाटकर, आदील फरास यांच्यासह इतर उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, 2019 व 2021 मधील पुरामुळे शहरातील सर्व रस्ते धुवून गेले. त्यानंतर महापालिकेने 265 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करून निधीची मागणी केली. परंतू दोन-तीन वर्षे प्रस्ताव धूळखात पडला होता. 2019 ला निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद कायम ठेवले. त्यामुळे कोल्हापूर शहरातील महत्वाचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. विविध प्रकल्पांना निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था, नागरिकांना येणार्‍या अडचणी याची माहिती दिली. रस्ते प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्याची विनंती केली. त्याचवेळी केवळ मला श्रेय मिळू नये आणि सगळे मीच करतोय असे दाखविणार्‍या एका नेत्याने बैठकांना विरोध केला. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी निधी मंजूर केला. त्यामुळे 100 कोटींच्या रस्ते कामांच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री शिंदे यांना आणण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मी आणि पालकमंत्री मुश्रीफ प्रयत्नशील होतो, त्यात बिघडले काय?, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

पैसे कोणाच्या बापाचे नसतात!

पैसे आले म्हणजे कोणाच्या बापाचे नसतात. त्याला योग्य प्रक्रिया असते. कायदेशिर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. यापूर्वी आयआरबी आणि नगरोत्थानच्या कामांचा वाईट अनुभव आहे. त्या कामात युटिलिटी शिफ्टींग न केल्याने नंतर मोठ्या प्रमाणात खोदाई झाली. हा वाईट अनुभव पाठीशी असल्याने 100 कोटींच्या कामासाठी ठेकेदार कंपनीला वर्कऑर्डर दिल्यानंतर आयुक्तांसोबत बैठक घेतली. 16 रस्त्यांतील युटिलिटींचा सर्व्हे करून त्या शिफ्ट करण्याची सूचना केली. आता सर्व्हे पूर्ण झाला. त्यामुळे थोड्या विलंबाने काम सुरू होत असल्याचेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

Back to top button