कोल्हापूर जिल्हा तीर्थक्षेत्र म्हणून देशात नंबर 1 वर आणू : हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्हा तीर्थक्षेत्र म्हणून देशात नंबर 1 वर आणू : हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सादरीकरण झाले आहे. राज्य शासन एक हजार कोटी देण्यासाठी सकारात्मक आहे. अंबाबाई मंदिरासह श्री जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी दत्त मंदिर व परिसराचाही विकास करण्यात येईल. सध्याच्या दहापट भाविकांची संख्या वाढवून कोल्हापूर जिल्हा देशात तीर्थक्षेत्र म्हणून एक नंबरवर आणू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील रहिवासी व व्यापार्‍यांना योग्य मोबदला देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात 100 कोटींच्या रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याला पुढील आर्थिक वर्षात निधीची तरतूद होईल. जनतेसमोर हा आराखडा सादर केला जाईल. विकासकामांसाठी सर्वांनी सहकार्य करावे. कुणाला प्रश्न किंवा शंका असतील, तर आमच्याशी किंवा अधिकार्‍यांशी संपर्क साधा. तसेच कोल्हापूर हे आदर्श शहर बनविण्याची ग्वाहीही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली.

5-10 वर्षे टिकतील असे रस्ते करा

रस्ते खराब असल्याने नागरिकांना त्रास होत होता. त्यामुळे काम लवकर सुरू व्हावे, असे वाटत होते. युटिलिटी शिफ्टिंगचे काम पूर्ण झाल्याने 16 रस्त्यांचे काम सुरू झाले. पाच-दहा वर्षे टिकतील असे दर्जेदार आणि चांगले रस्ते व्हावेत. राजेश क्षीरसागर यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि आम्ही महायुती म्हणून शहर विकासाला चालना देऊ. रस्ते, पाण्यासह सर्व प्रश्न मार्गी लावू, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

थेट पाईपलाईन, रस्त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप संपूर्ण शहराला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. थेट पाईपलाईन योजनेसह 100 कोटींतून होणार्‍या रस्त्यांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत केला जाईल, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केले.

हद्दवाढ, खंडपीठ प्रश्न सोडवणार : राजेश क्षीरसागर

क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. निवडणुका येतात-जातात आणि हार-जीत होत राहते; पण नागरिकांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. कोल्हापूरची हद्दवाढ, खंडपीठासह शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही क्षीरसागर यांनी दिली.

आ. जयश्री जाधव यांनी शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे 100 कोटींतील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार? अशी विचारणा केली जात होती. ठेकेदारांनी दर्जेदार रस्ते करावेत. गुणवत्तापूर्ण रस्ते होण्यासाठी नागरिकांनीही दक्ष राहावे, असे आवाहन केले.
महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी 100 कोटींच्या रस्ते प्रकल्पाची माहिती दिली. 16 रस्त्यांचे काम दीड वर्षात पूर्ण केले जाईल, असे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, माजी उपमहापौर विलास वास्कर, राजू लाटकर, किरण नकाते, महेश जाधव, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news