कुरूंदवाडच्या सुनील चव्हाण हत्या प्रकरणातील भबिरे, कित्तुरेला ‘मोका’ | पुढारी

कुरूंदवाडच्या सुनील चव्हाण हत्या प्रकरणातील भबिरे, कित्तुरेला ‘मोका’

कुरूंदवाड, पुढारी वृत्तसेवा : येथील सुनील चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राहुल भबिरे, पवन कित्तुरे आणि सांगली जिल्ह्यातील सागर पवार गँगच्या 7 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ‘मोका’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सुनील चव्हाण यांचा 16 ऑक्टोबर 2023 रोजी जुन्या भांडणाचा राग मनात धरून खून करण्यात आला होता. तपासामध्ये सांगली जिल्हा पोलिस दलाच्या रेकॉर्डवरील कुख्यात आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सागर्‍या ऊर्फ सागर अरविंद पवार (रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली) व टोळीतील गुंड राहुल किरण भबिरे, पवन नागेश कित्तुरे (रा. परीट गल्ली, कुरूंदवाड), शहाजहान अल्लाबक्ष पठाण (रा. कृष्णानगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले), अनिकेत दत्तात्रय ढवणे, तुषार तुकाराम भारंबळ, रोहन किरण जावीर, रितेश विकास खरात, रोहन माणिक ठोकळे (रा. आदर्शनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) व विधी संघर्षित बालक यांचा सहभाग निष्पन्न झाला. या पवार टोळीविरुद्ध एकूण 15 गंभीर गुन्हे नोंद असून, खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रानिशी गर्दी, मारामारी, किरकोळ व गंभीर दुखापत, खंडणी वसुली या गुन्ह्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सक्रिय असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि समाजकंटकांचा बीमोड करण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांनी कडक प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स.पो.नि. फडणीस यांनी इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक, निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून पवार टोळीविरुद्ध ‘मोका’अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी प्रस्तावाची छाननी करून प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला असता प्रस्तावाला मंजुरी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटक आणि गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कुरूंदवाड शहरातील भबिरे आणि कित्तुरे या दोघांचाही ‘मोका’अंतर्गत कारवाईत समावेश झाल्याने शिरोळ तालुक्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

Back to top button