कोल्हापूर : महायुतीचा एकजुटीचा निर्धार

कोल्हापूर : महायुतीचा एकजुटीचा निर्धार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मागील काळातील संघर्ष आणि आपसातील मतभेद मिटवून एकजुटीने लोकसभा निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्धार महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रविवारी केला. महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा येथील महासैनिक दरबार येथे झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वगुरू होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा मनोदयही यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम गरिबांना न्याय देणारे आहे. मोदी यांचे हे काम जनतेपर्यंत घेऊन गेले पाहिजे. भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांचे सरकार एकदिलाने काम करीत आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मतभेद नाहीत हा संदेश देण्यासाठी राज्यात एकाचवेळी सर्वच ठिकाणी असे मेळावे घेतले आहेत. राजीव गांधी यांनी केलेल्या एक रुपयांतील केवळ 18 पैसे थेट गावात पोहोचतात या वक्तव्याची आठवण करून देत मुश्रीफ म्हणाले, मोदी सरकारने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे धोरण आखल्याने थेट लाभार्थ्यांना पूर्ण पैसे मिळण्यास मदत झाली आहे.

आज जगभरात भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. कोणत्याही देशाची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही. ही परिस्थिती कायम राखण्यासाठी 'तिसरी बार मोदी सरकार' आणि 'अब की बार 400 पार' या घोषणा अंमलात आणल्या पाहिजेत. राज्यातील 48 जागा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करून मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करूया, असे अवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

जानेवारीअखेर विविध समित्यांच्या नेमणुका पालकमंत्री म्हणून महायुतीच्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन काम सुरू आहे. जानेवारीअखेर जिल्ह्यातील विविध समित्यांच्या नेमणुका जाहीर करुन कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल. एवढेच नाही तर महामंडळाच्या नियुक्त्याही तातडीने होण्यासाठी मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

खा. धनंजय महाडिक म्हणाले, संक्रांत म्हणजे वर्षभरातील कटुता विसरून प्रेम आणि आदराने राहण्याची संधी आहे. हाच धागा पकडून हा महायुतीने मेळावा घेतला आहे. विविध सर्वेक्षणात जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांना 76 टक्के मते असतील असा अंदाज आहे. असे असले तरी आपण गाफील राहता कामा नये. सात ते आठ टक्के नवमतदार आहेत. त्यांना काँग्रेसच्या काळातील भ—ष्टाचाराची माहिती नाही. देशात गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने केलेले बदल जनतेला सांगितले पाहिजे.

2027 मध्ये जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकावर नेण्याचे मोदी यांचे प्रयत्न आहेत. मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान केले पाहिजे, असे सांगून खा. महाडिक म्हणाले, गरिबी हटावचा नारा दिलेल्या काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत काही काम केले नाही. मोदी सरकारने मात्र दहा वर्षांत युवक, महिला, सामान्य माणूस आणि शेतकर्‍यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या घटकांसाठी विविध योजना राबवून त्यांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे. मोदी सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात दरमहा 6 हजार रुपये जमा करते. हा आकडा 12 होणार आहे. देशात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकार राज्याच्या विकासाचे धाडसी निर्णय घेत आहे. त्यामुळे विश्वगुरू होण्याचे मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणूया, असे खा. महाडिक म्हणाले.

खा. संजय मंडलिक म्हणाले, व्यासपीठावरील सर्वांनी चांगले-वाईट भोग भोगले आहेत. ते सारे विसरून आता एकदिलाने काम करूया. मोदी यांच्यामुळे संसदेत अनेक चांगल्या घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे नेते आहेत. इंडिया आघाडीचा नेता ठरत नाही. वारंवार बैठका घ्याव्या लागतात, अशी टीका खा. मंडलिक यांनी विरोधकांवर केली. राज्यात सतत बेकायदेशीर सरकार अशी टीका करणार्‍यांची आता तोंडे बंद झाली आहेत. सरकार कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे, असे खा. मंडलिक म्हणाले.

प्रत्येकाने मनातील किल्मिष काढून यशस्वी वाटचाल पुढे नेऊया, असे सांगून आ. विनय कोरे म्हणाले, आगामी लोकसभेसाठी एकदिलाने काम करूया. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, 'अब की बार 400 पार'चा नारा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकल्या पाहिजेत. घटक पक्षांनी हातात हात घालून काम करूया.

व्यासपीठावरील जोड्या अन् हास्यकल्लोळ

व्यासपीठाकडे अंगुलीनिर्देश करून खा. धैर्यशील माने म्हणाले, बघा कशा जोड्या लागल्या आहेत. मुश्रीफ-समरजित घाटगे, मंडलिक-महाडिक, आवाडे-हाळवणकर, के. पी. – ए. वाय. असा उल्लेख करताच नेत्यांसह कार्यकर्तेही हास्यकल्लोळात बुडाले. महायुतीच्या नेत्यांनी छोट्या पक्षासह छोट्या कार्यर्त्यांकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

मिक्स भाजीची मेजवानी

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मेळाव्याच्या मुहूर्ताकडे लक्ष वेधले. रोज एकच भाजी असल्याने भोगीनिमित्त व्यासपीठावरही मिक्स भाजीची मेजवानी मिळाल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला.

वैयक्तिक मतभेद बाजूला

वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून देश प्रथम या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या हॅटट्रिकसाठी एकत्र आलो असल्याचे भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

आम्हाला समजून घ्या

आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, आम्हाला सामावून आणि समजून घ्या. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना ताकद द्यावी.

मेव्हण्या-पाहुण्याची गोची

माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांचा संघर्ष सर्वज्ञात आहे. खुर्चीवर नावे असल्याने व्यासपीठावर दोघांना जवळजवळ खुर्च्या मिळाल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली. मनोमिलनाच्या या मेळाव्यात हे दोघे एकमेकांकडे पाहातही नव्हते. अखेर के.पीं.नी खुर्ची बदलून इतरत्र बसणे पसंत केले. याची उपस्थितांत चर्चा रंगली.

यावेळी आ. प्रकाश आवाडे, आ. राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, रिपाइं (आठवले) चे उत्तम कांबळे यांची भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अशोक देसाई यांनी केले. आदिल फरास यांनी आभार मानले.

मेळाव्यास माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, माजी आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, ए. वाय. पाटील, सत्यजित कदम, विजय जाधव, राहुल चिकोडे, राहुल देसाई, डॉ. संजय पाटील, शहाजी कांबळे, राजवर्धन नाईक निंबाळकर, शौमिका महाडिक, नाथाजी पाटील, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, भैया माने, शिवाजी पाटील, संग्रामसिंह कुपेकर, शीतल फराकटे, गायत्री राऊत, रेखा आवळे, जहिदा मुजावर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news