कोल्हापूर : पैसे परत मागितल्याने लॉज मालकाची गोळी घालून हत्या; मुलालाही ठार मारण्याचा प्रयत्‍न

कोल्हापूर : पैसे परत मागितल्याने लॉज मालकाची गोळी घालून हत्या; मुलालाही ठार मारण्याचा प्रयत्‍न
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रक्कम दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून लॉजमालक चंद्रकांत पाटील यांच्याकडून संशयित मारेकर्‍यांनी 5 लाख रुपये घेतले. मात्र, ते परत मागताच पैसे तर दिले नाहीच; उलट गोळी घातली. यात लॉजमालक चंद्रकांत पाटील यांचा मृत्यू झाला. हा थरार शनिवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास दोनवडे फाटा (ता. करवीर) येथे घडला. त्यानंतर हल्लेखोरांनी पाटील यांच्या मुलावर हल्ला केल्याने तोही जखमी झाला आहे.

हल्लेखोरांनी मुलगा रितेश चंद्रकांत पाटील (वय 25) याच्याही हत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तो बचावला. या घटनेमुळे करवीर तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित हल्लेखोर दत्तात्रय पाटील (35), सचिन जाधव (30, दोघे रा. खुपिरे, ता. करवीर) हे रात्री उशिरा करवीर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.

सतत वर्दळ असलेल्या दोनवडे फाट्यावरील गोल्डन लॉजिंग व बोर्डिंगमध्ये हा थरार घडल्याने परिसरात ग्रामस्थांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गोळीने पोटाचा आरपार वेध घेतल्याने गंभीर अवस्थेत पाटील यांना रुग्णालयात नेताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी रात्री उशिरा घटनास्थळासह रुग्णालयाकडे धाव घेऊन मुलाकडे चौकशी केली.

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, चंद्रकांत पाटील यांचा हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय आहे. दोन वर्षांपूर्वी संशयित दत्तात्रय पाटील याने दामदुप्पट गुंतवणुकीचे आमिष दाखवून लॉजमालकाकडून पाच लाख रुपये घेतले होते. परताव्याची मुदत संपल्यानंतरही संशयिताने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. चंद्रकांत पाटील वर्षभरापासून संशयिताच्या संपर्कात होते; मात्र तो भेटण्याचे टाळत होता. मोबाईलही घेत नव्हता.

चंद्रकांत पाटील हे कन्येच्या विवाहाच्या तयारीत होते. मुलीसाठी वर शोधण्यास सुरुवात केली होती. संशयित दत्तात्रय पाटील याच्याकडे गुंतवणूक केलेली पाच लाखांची रक्कम मिळाल्यास मुलीचे लग्न ठरविण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी संशयिताच्या मागे पैशांसाठी तगादा लावला होता.

पाच लाखांच्या रकमेसाठी लॉजमालकाने तगादा लावल्याने संशयित दत्तात्रय पाटील चिडून होता. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वादावादीही झाली होती. शनिवारी रात्री नऊ वाजता चंद्रकांत पाटील हे लॉजमध्ये काऊंटरवर बसले होते. त्यानंतर अवघ्या सहा-सात मिनिटांनंतर संशयित दत्तात्रय पाटील व त्याचा साथीदार सचिन जाधव दुचाकीवरून लॉजमध्ये आले. या दोघांनी चंद्रकांत पाटील यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

वडील चंद्रकांत पाटील यांना मारहाण होत असल्याचे पाहून मुलगा रितेश पाटील याने हल्लेखोरांच्या तावडीतून वडिलांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांनीही पिता-पुत्रांना मारहाण करून त्यांची कपडे फाडली. चंद्रकांत पाटील आणि दत्तात्रय पाटील यांची समोरासमोर झटापट होत असतानाच हल्लेखोराने कमरेचे रिव्हाल्व्हर काढून अवघ्या दोन ते तीन फुटांवरून पोटात गोळी झाडली. गोळीने आरपार वेध घेतल्याने लॉजमालक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

गोळीबारामुळे भेदरलेल्या मुलाने आरडाओरड करून काऊंटरच्या आडोशाच्या आश्रय घेतला. लॉजमालकाची गोळी झाडून हत्या केल्याची माहिती समजताच दोनवडे फाट्यावरील व्यावसायिक, वाहनचालक व ग्रामस्थांनी लॉजकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात तडफडणार्‍या चंद्रकांत पाटील यांना तातडीने उपचारांसाठी हलविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

संशयित दत्तात्रय पाटील व सचिन जाधव हे मूळचे खुपिरे येथील असून, त्याचा ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. कमी काळामध्ये दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने दत्तात्रय पाटील याने परिसरातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. रात्री उशिरा करवीर पोलिस ठाण्यात दत्तात्रय पाटील व सचिन जाधव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने दोघे हल्लेखोर रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news