गुडाळ; पुढारी वृत्तसेवा राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड-कसबा तारळे मार्गावर गजानन महाराज मंदिराच्या जवळ तीव्र उतारावर असलेल्या धोकादायक वळणावर गौण खनिज भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक (क्र. MH 09 CV 6892) चा ब्रेक फेल झाला. हा ट्रक दगडी संरक्षण कठडा उद्ध्वस्त करून पलटी झाला. ही दुर्घटना (गुरुवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, रातोरात संबंधितांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रक सरळ करून त्यामधील गौण खनिज अन्य वाहनातून नेल्याचे सांगण्यात येत असून, हे गौण खनिज दुर्गमानवाड- तळगाव परिसरातील अवैधरित्या उत्खनन केलेले बॉक्साईट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, युवराज विलास पाटील (सम्राटनगर,कोल्हापूर) यांच्या मालकीचा सहा चाकी लेलँड ट्रक दुर्गमानवाड कडून गौण खनिज घेऊन जात होता. यावेळी कसबा तारळे नजीक उतारावर हा ट्रक पलटी झाला. स्वतः चालक असलेल्या पाटील यांनी ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी झाल्याचे सांगत आपल्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगितले. रस्त्याकडेचा किमान 15 फूट लांबीचा मजबूत दगडी संरक्षण कठडा उध्वस्त करून हा ट्रक रस्त्याच्या दरीकडील बाजूस कलंडला होता. ट्रक मधील बॉक्साईट सदृश काही गौण खनिज डोंगर उतारावर घरंगळत पडल्याचे दिसत होते.
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर कसबा तारळेचे गाव कामगार तलाठी निलेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. राधानगरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीही अपघात स्थळी भेट दिली. मात्र चालकाची काही तक्रार नसल्याने गुन्हा नोंद न केल्याचे अजब उत्तर राधानगरी पोलिसातून देण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कठड्याचे जे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, ट्रकची पुढील बाजूची दोन्ही चाखे निखळून मागे सरकली होती.
तळगाव-दुर्गमानवाड परिसरातून अवैध बॉक्साइड उत्खनन करून रातोरात त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा याकडे जाणून-बुजून डोळेझाक करीत असल्याचा स्पष्ट आरोप कसबा तारळे येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुरुनाथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
हेही वाचा :