भाजपप्रणीत खोके सरकार रिव्हर्स गिअरमध्ये : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे चांगले चाललेले सरकार धोक्याने पाडून भाजपप्रणीत खोके सरकार स्थापन करण्यात आले. परंतु, हे सरकार महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याऐवजी मागे नेत आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी वाढली आहे. सरकार रिव्हर्स गिअरमध्ये असून, महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात असल्याचा आरोप शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा खासदार निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे महानिष्ठा, महान्याय सभा आयोजित केली होती. त्या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. संपर्क नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आ. सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना महिला आघाडी कोल्हापूर शहरप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत महाराष्ट्राची चौफेर प्रगती सुरू होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात उद्योग क्षेत्रात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक झाली; पण प्रगतिपथावर असलेल्या महाराष्ट्राच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला. आम्हाला हैराण करून गद्दारांचे सरकार स्थापन केले. राज्याचा विकास खुंटला असल्याने सरकारविरोधात जनतेत प्रचंड आक्रोश आहे. देशविदेशातून महाराष्ट्रात गुंतवणूक वाढण्याऐवजी कमी झाली आहे. मोठमोठे उद्योग गुजरातकडे वळविले जात आहेत. बेरोजगारी वाढली आहे. दमदाटीच्या सरकारकडून बदलीसाठी अधिकार्‍यांकडे पैशाची मागणी केली जात आहे.

महाराष्ट्राने देशाला खुप दिल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, आजपर्यंत कोणत्याही केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला नव्हता. परंतु, गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रावर प्रचंड अन्याय सुरू आहे. महाराष्ट्रात आलेले मोठमोठे उद्योग गुजरातमध्ये पळविले आहेत. गद्दार आमदारांना त्याविषयी काहीही वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते. राज्याला विकू शकतात ते आपल्याला सोडणार आहेत का? मात्र गुजरातमध्ये नेलेला उद्योग त्याठिकाणी उत्पादनाचा खर्च परवडत नाही म्हणून बंद पडला. यात देशाचे मोठे नुकसान झाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी घेतली. परंतु, मुख्यमंत्र्यांना तेच भेटायला गेले. हा प्रकार न्यायमूर्ती आरोपीला भेटायला गेल्यासारखा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जाणार्‍या नार्वेकर यांच्याकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवायची? सत्याच्या बाजूने लढणार्‍यांना हैराण केले जात आहे. 'ईडी'सह इतर संस्थांकडून त्रास दिला जात आहे; पण संविधान आणि जनतेवर आमचा विश्वास आहे. 'हृदयात राम अन् हाताला काम' हे आमचे हिंदुत्व आहे. जाती-धर्मात भांडणे न लावता सर्वांना पुढे घेऊन जाणे हे आमचे हिंदुत्व आहे. माणूस म्हणून सर्वांचे रक्षण करणे हे आमचे हिंदुत्व आहे, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेना नेते नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, सत्तेसाठी राजनीतीचा वापर करून महाराष्ट्र अस्थिर करायचे काम सुरू आहे. उपनेते व जिल्हाप्रमुख पवार म्हणाले, 100 कोटी मंजूर होऊनही कोल्हापूर खड्डेपूर बनले आहे. कोट्यवधींचा निधी रंकाळ्यात बुडाला आहे. टक्केवारीचे शहर म्हणून कोल्हापूर बदनाम होत आहे. सभेला माजी आ. सुरेश साळोखे, संजय घाटगे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, डॉ. चेतन नरके आदींसह इतर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news