माजी नगरसेविकेच्या पुत्रासह 6 जणांना अटक : पोलिस कोठडी | पुढारी

माजी नगरसेविकेच्या पुत्रासह 6 जणांना अटक : पोलिस कोठडी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजारामपुरी येथील रेड्याची टक्कर चौक, खाऊगल्ली परिसरात तलवार, एअरगन तसेच चाकूच्या धाकाने दहशत माजवून दोघांना जखमी केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी माजी नगरसेविकेच्या पुत्रासह सहा जणांना सोमवारी अटक केली. न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

साहिल काकासाहेब पाटील (वय 35) सुरज राजेंद्र महाजन (35) सुरज चंद्रकांत कलकुटगी (25), निखिल सुरेश शेळके (28), दस्तगीर ऊर्फ बबल्या बशीर मुल्ला (30), सलमान शरिफ मुकादम (28, रा. सर्व, राजारामपुरी, कोल्हापूर) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. संशयितांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात राजू दिलीप पाथरूट, प्रवीण वडर (रा. राजारामपुरी) हे जखमी झाले आहेत. संशयितांकडून तलवार, एअरगन व चाकू हस्तगत करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.

राजारामपुरी परिसरातील सागर माळ, रेड्याची टक्करी मैदानाजवळील खाऊगल्लीत रविवारी सायंकाळी माजी नगरसेविका पद्मावती काकासाहेब पाटील यांचा पुत्र साहिल पाटीलसह त्याच्या साथीदारांनी प्रचंड दहशत माजवली होती. भरचौकात घडलेल्या प्रकारामुळे बघ्यांची गर्दी झाली होती.

काहीकाळ तणावपूर्ण स्थितीही निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला होता. याप्रकरणी प्रसाद सुरेश घाटगे (वय 33, रा. शाहूनगर, दत्त गल्ली, राजारामपुरी) यांनी रविवारी रात्री संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली.

फिर्यादी घाटगे यांचा खाऊगल्ली येथे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा गाडा कुलदीप रजपूत यांच्या गाडीवरील कामगार राजू दिलीप पाथरूट यांना चालवण्यास दिल्याने या कारणातून घाटगे व संशयित साहिल याच्यात मतभेद निर्माण झाले होते. या कारणातून साहिलसह त्याचे साथीदार जाब विचारण्यासाठी खाऊ गल्लीत आले होते. यावेळी मुख्य संशयितासह त्याच्या साथीदारांनी राजू पाथरूटसह त्याचा चुलतभाऊ प्रवीण वडर यांना शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. साहिल पाटील याने कांदा कापण्याच्या चाकूने प्रवीण वडर याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर पुन्हा काही काळाने साहिलसह त्याच्या साथीदारांनी तलवारीसह एअरगनचा धाक दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या घटनेची दखल घेत संशयिताविरुद्ध कठोर कारवाईचे तपासाधिकार्‍यांना निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून मुख्य संशयितासह 6 जणांना अटक केली. संशयितांच्या ताब्यातून तलवार, एअरगन, चाकू हस्तगत करण्यात आल्याचे तनपुरे यांनी सांगितले. गुन्ह्यात आणखी काही साथीदारांचा समावेश असावा का, याचीही माहिती घेण्यात येत आहे.

Back to top button