असमान निधी वाटप; प्रसंगी न्यायालयात जाऊ : सतेज पाटील | पुढारी

असमान निधी वाटप; प्रसंगी न्यायालयात जाऊ : सतेज पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सर्वत्र महायुतीने विरोधी पक्षातील आमदारांना जिल्हा नियोजनातून केवळ दहा टक्के निधी देण्याचा फॉर्म्युला तयार केला आहे. यातून जनतेची विकासकामे कशी होणार, असा सवाल करत काँग्रेस आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. महायुती सरकारच्या या फॉर्म्युल्याविरोधात प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा आ. सतेज पाटील यांनी दिला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या सुरुवातीला काँग्रेसच्या आमदारांनी निधी वाटपाबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. राज्यात सर्वत्र असा प्रकार सुरू आहे, त्याचा निषेध करत आम्ही बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे सांगितले.

माध्यमांशी बोलताना आ. पाटील म्हणाले, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षातील निवडून आलेल्या आमदारांना नियोजन समितीच्या निधीतून केवळ 10 टक्के निधी दिला जात आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी जनतेने निवडून दिले आहे. त्यांची विकासकामे आम्ही करायाची नाहीत का? केवळ सत्ताधार्‍यांना मतदारसंघ आहे आणि विरोधी पक्षातील आमदारांना मतदार संघ नाही का? उद्या निवडणुका लागल्या तर मते मागायला सत्ताधारी आमदार जाणार नाहीत का? या मनमानी कारभारा विरोधात जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी बहिष्कार घातला आहे

राज्यात मुख्यमत्री, अर्थमंत्री व दोनशे मतदारसंघाचे राज्य आहे. स्वत:च्या पक्षाचे आमदार सांभाळायचे या हेतूने कारभार सुरू आहे. निधी किती देण्यात आला, याबाबत गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी जाहीर करू.

Back to top button