शिंदे गटाचे कोल्हापुरातून रणशिंग; लोकसभेसाठी शिवसेनेची तयारी : पदाधिकारी मेळावा, अधिवेशनातून शक्‍तिप्रदर्शन | पुढारी

शिंदे गटाचे कोल्हापुरातून रणशिंग; लोकसभेसाठी शिवसेनेची तयारी : पदाधिकारी मेळावा, अधिवेशनातून शक्‍तिप्रदर्शन

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत शिवसेना शिंदे गटही कोल्हापुरातून लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहे. दि. 27 रोजी शिवसंवाद मेळावा होणार असून, दि. 28 रोजी राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे. त्यासाठी राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी कोल्हापुरात उपस्थित राहणार आहेत.

मूळ शिवसेनेतून 13 खासदार फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. या खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. जेव्हा या खासदारांनी मूळ शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला, त्यावेळी त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी थेट चर्चा झाली होती. या चर्चेत काय ठरले, हे गुलदस्त्यात आहे. ना खासदार त्याची चर्चा करतात, ना पदाधिकारी त्याविषयी बोलतात. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हाच चित्र स्पष्ट होईल.

उद्धव ठाकरे यांच्या भाषेत पश्चिम महाराष्ट्र हा युतीसाठी दुष्काळी भाग होता; कारण शिवसेनेचे आमदार अपवादानेच येथून निवडून येत होते. जुना कोल्हापूर म्हणजे सध्याचा कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाने मध्यंतरीचे दोन अपवाद वगळता 1990 पासून सातत्याने धनुष्यबानाला साथ दिली आहे. 2004 व 2019 च्या निवडणुका याला अपवाद ठरल्या. यावेळी कोल्हापूरने काँग्रेस उमेदवाराला साथ दिली.

राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने शिंदे शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसारगर यांनी आढावा घेतला. दोन खासदार, एक आमदार आणि एक कॅबिनेट मंत्री दर्जाचे पद जिल्ह्यात शिंदे यांच्याकडे आहे. ही ताकद कायम ठेवून त्यांना राजकीय वर्चस्व वाढवायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल. आपले काम सरकार दरबारी होते, असा विश्वास सर्वसामान्यांमध्ये रुजवावा लागेल. राष्ट्रीय अधिवेशनानंतर कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील तेव्हाच नेत्यांची स्वप्ने साकार होतील.

दुष्काळी भाग म्हणता म्हणता हातचे पीक गेले 

सन 2014 मध्ये राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरूडकर, उल्हास पाटील व प्रकाश आबिटकर हे 10 पैकी 6 आमदार शिवसेनेचे निवडून आले. 2019 मध्ये शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे एकमेव आमदार निवडून आले, तर याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोघेही खासदार म्हणून निवडून आले आणि शिवसेनेने कोल्हापुरातून लोकसभेसाठी खाते उघडले; मात्र कोल्हापूर शिवसेनेसाठी कायम दुष्काळी भाग म्हणता म्हणता आलेले शिवसेनेचे पीक नेत्यांच्या हातातून कधी निसटून गेले, हे त्यांनाही कळले नाही.

Back to top button