कोल्हापूर : शेतकरी संघाची निवडणूक नेत्यांच्या हाती

कोल्हापूर : शेतकरी संघाची निवडणूक नेत्यांच्या हाती
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एकेकाळी संपूर्ण आशिया खंडात नावाजलेल्या व सहकाराचा आदर्श म्हणून नावलौकिक असलेल्या शेतकरी सहकारी संघाची अवस्था दयनीय झाली आहे. या संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. दोन गटांत ही निवडणूक होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे; मात्र ही निवडणूक टाळण्यासाठी जुन्या संचालकांनी नेत्यांना साद घातली आहे.

संघाच्या जुन्या संचालकांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील, विनय कोरे व प्रकाश आवाडे यांना संघाची आर्थिक परिस्थिती पाहता निवडणूक बिनविरोध करण्याचा विनंती केली आहे. त्याला नेते किती प्रतिसाद देतात, यावर शेतकरी संघाच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

मुश्रीफ यांचे निकटवर्ती युवराज पाटील यांच्या हाती शेतकरी संघाचे सुकाणू होते; मात्र गेल्या वर्षभरापासून सुरेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांचे प्रशासक मंडळ काम पाहत आहे. गेल्या काही वर्षांत संघात बरेच बदल झाले आहेत. 34 हजारांपैकी 23 हजार 300 सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या तत्कालीन संचालकांच्या निर्णयाला सुरेश देसाई यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर हे सभासद पात्र ठरले. तसेच संस्थांचेही झाले. सुमारे 800 संस्था रद्द करण्यात आल्या होत्या. त्याही न्यायालयाच्या निर्णयनंतर सभासद म्हणून टिकल्या आहेत. आता 34 हजार व्यक्ती सभासद आहेत, तर 1 हजार 800 पैकी 1 हजार 500 संस्थांचे ठराव आले आहेत. पूर्वी बाबा नेसरीकर, वसंतराव मोहिते, आनंदराव चुयेकर यांच्या हाती सत्ता होती. त्यानंतर युवराज पाटील यांचा त्यामध्ये समावेश झाला. पुढे सुरुवातीचे नेते बाजूला पडून युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली.

आता युवराज पाटील यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे ते पडद्यामागून पॅनेलच्या हालचाली करत आहेत, तर त्यांच्याविरोधात वसंतराव मोहिते, अजितसिंह मोहिते, यशोधन नेसरीकर, सुरेश देसाई, धनाजीराव सरनोबत, विजय पोळ, भादोलेकर माने आदींचे पॅनेल असेल. मोहिते-नेसरीकर गटाने वरील नेत्यांची भेट घेऊन बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी विनंती केली आहे. आता निर्णयाचा चेंडू नेत्यांच्या कोर्टात आहे. सध्या शेतकरी संघाचा संचित तोटा सुमारे दीड कोटी रुपयांच्या घरात आहे. निवडणूक लागल्यास 50 लाखांचा भार संघावर पडणार आहे.

युवराज पाटील यांचा मुद्दा कळीचा

युवराज पाटील हे मुश्रीफ यांचे निकटवर्ती आहेत. त्यांच्या अपात्रतेबद्दल आग्रही भूमिका घेणारी मंडळी नेत्यांकडे बिनविरोधची मागणी घेऊन गेले होते. मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयाविरुद्ध घेतलेली भूमिका त्यांना अडचणीची ठरू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news