कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत सरप्राईज उमेदवार असेल : आ. सतेज पाटील | पुढारी

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत सरप्राईज उमेदवार असेल : आ. सतेज पाटील

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत सरप्राईज उमेदवार असेल. जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित होईल. अद्याप कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही; मात्र महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आम्ही राहणार असल्याचे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

छत्रपती राजाराम साखर कारखान्याकडून विरोधी गटातील सभासदांना वेळेत ऊसतोड मिळत नसल्याने पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आ. पाटील म्हणाले, देशभरातील वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या बाजूने जनभावना असल्याचे दिसते. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार निवडून आले आहेत. आता मात्र शिंदे गटाच्या अनेकांनी कमळ चिन्हावर लढायची तयारी ठेवली आहे. तसे पत्रही काहींनी दिल्याचा गौप्यस्फोट आ. पाटील यांनी केला.

शिवसेना शिंदे गटाकडून काढण्यात येणार्‍या शिव संकल्प यात्रेतून काहीही साध्य होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावरून आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आ. पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी विरोधकांना किती निधी दिला, असा सवाल उपस्थित केला होता. यावर सतेज पाटील म्हणाले, मी पालकमंत्री असताना किती निधी दिला, हे पालकमंत्री मुश्रीफ यांना माहिती आहे. कारण, ते माझ्या शेजारीच बसत होते. निधी वाटपात जर अन्याय झाला, तर प्रसंगी न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

महाविकास आघाडीसोबत शेट्टींना घेण्यासाठी प्रयत्नशील

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या सहा जागा लढवण्याची घोषणा केली आहे; मात्र ते महाविकास आघाडीसोबत कसे राहतील, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. राज्य पातळीवर बसून विरोधी सर्व पक्षांना कसे एकत्र आणता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यभरात भाजपविरोधी वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीलाच जनतेचा कौल मिळेल, असा विश्वासही आ. पाटील यांनी व्यक्त केला.

Back to top button