दाखल्यांसाठी करवीर तहसील कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ | पुढारी

दाखल्यांसाठी करवीर तहसील कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

दाखल्यांसाठी करवीर तहसील कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. दाखले प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रवेश प्रक्रियेसह विविध परीक्षांचे अर्ज भरताना विद्यार्थी, उमेदवारांसह पालकांचा जीव मेटाकुटीला येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे दाखले सोडण्यासाठी आवश्यक असलेला सरकारी पासवर्ड दोघा खासगी ई-सेवा केंद्र चालकाकडे असल्याची चर्चा आहे.

करवीर तहसील कार्यालयात दाखल्यांची संख्या अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. दररोज दाखल होणार्‍या दाखल्यांच्या तुलनेत निर्गतीचे प्रमाण कमी आहे. यामुळे दाखला वेळेत मिळावा यासाठी अनेकांना वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते अगदी मंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत धाव घ्यावी लागत आहे.

करवीर तालुक्यातील दाखल्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा इंटरनेटचा प्रश्न असतो. अधिकारी, कर्मचार्‍यांकडे असलेल्या कामाची जबाबदारी आणि त्याचा व्याप पाहता, दाखल्यांच्या निर्गतीला विलंब होऊ शकतो. म्हणून दाखल्यांसाठी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ नागरिक, विद्यार्थ्यांवर यावी, हे दुर्दैवीच आहे. याबाबत दैनंदिन नियोजन झाल्यास दाखल्याची निर्गत वेगाने होईल आणि दाखला वेळेवर मिळण्यास मदत होईल.

दाखल झालेली तारीख, ते पुढच्या स्वाक्षरीसाठी सोडलेली तारीख आणि अंतिम स्वाक्षरी झालेली तारीख यानुसार गेल्या काही महिन्यातील दाखल्यांची माहिती घेतली तर दाखल्यांसाठी केला होणारा विलंब स्पष्ट होईल. प्रवेश घेताना, नोकरीचे अर्ज भरताना अनेक विद्यार्थी, उमेदवारांना अखेरच्या दिवसापर्यंत दाखल्यांसाठी हेलपाटे मारायला लागले.

जिल्हाधिकारी दखल घेणार का?

दाखल्यांच्या दिरंगाईबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मोठी चर्चा झाली. यामुळे दाखल्यांबाबत दर महिन्याला जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घ्यावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी या सर्व प्रकाराची दखल घेणार का, असा सवाल आहे.

सरकारी पासवर्ड कार्यालयाबाहेर हे दाखले सोडण्यासाठी कर्मचारी, अधिकार्‍यांना पासवर्ड देण्यात आले आहेत. त्यानुसारच दाखल्याचे पोर्टल खुले होऊन, त्यावर ऑनलाईन स्वाक्षर्‍या होतात. मात्र, या कार्यालयातील हे सरकारी पासवर्ड कार्यालयाबाहेर असल्याची शंका आहे. शहरातील दोन महा-ई-सेवा केंद्रातून सादर केलेले दाखले वेळेत पुढे जातात आणि स्वाक्षरी होऊन ते मिळतात. मात्र, अन्य केंद्रांतून दाखल झालेले दाखले कित्येक दिवस पहिल्याच टेबलवर असतात. वारंवार आठवण करून दिल्यानंतर हे दाखले पुढे सोडले जातात, असेही चित्र आहे.

पाहा व्हिडिओ : मृण्मयी गोडबोलेचा क्रश सचिन खेडेकर सर

Back to top button