कोल्हापूर : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार करण्यात येणार्या इथेनॉलच्या दरात 6 रुपये 87 पैशाची वाढ केली आहे. त्यामुळे इथेनॉलची किंमत प्रतिलिटर 49 रुपये 41 पैसेवरून 56 रुपये 28 पैसे होणार आहे. त्याचा साखर कारखान्यांना व पर्यायाने शेतकर्यांना एफआरपी देण्यासाठी फायदा होणार आहे.
खरीप हंगामातील अपुर्या पावसामुळे यावर्षी उसाचे गाळप घटणार आहे. त्यामुळे देशाला आवश्यक तेवढी साखर उत्पादित होणार की नाही, याची शंका केंद्र सरकारला आहे. त्यामुळे बी हेवी मोलॅसिस आणि सिरप करण्यास केंद्र सरकारने कारखान्यांना बंदी घातली होती. या निर्णयास साखर कारखानदारांतून तीव्र विरोध झाला. त्यामुळे केंद्र सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर आता इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. यामुळे मोलॅसिसच्या निर्यातीला पायबंद बसणार आहे.
देशात इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे 1380 कोटी लिटर आहे. यातील 875 कोटी लिटर इथेनॉल मोलॅसिसवर आधारित तर 505 लिटर हे धान्यापासून तयार करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 2025 सालापर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी सरकारला 1016 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. सध्या 1380 कोटी लिटर देशात इथेनॉल तयार होत आहे. त्यात वाढ होण्यासाठी सरकारने इथेनॉल निर्मितीवर भर देणे सुरू केले आहे.
बी हेवी, सिरप दर स्थिर
केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणार्या इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ केली आहे. पण बी हेवी मोलॅसिस आणि सिरपच्या दरात वाढ केलेली नाही. यावरून फक्त साखरेच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला अटकाव घातला आहे.