महाराष्ट्राची कन्या बनली ‘मिसेस तेलंगणा’ | पुढारी

महाराष्ट्राची कन्या बनली ‘मिसेस तेलंगणा’

इचलकरंजी;पुढारी वृत्तसेवा : लहानपणापासूनच्या हुशारीला पालकांनी दिलेले प्रोत्साहन, आपल्या करियरची अचूक निवड, मेहनतीत सातत्य-प्रामाणिकपणा आणि निष्ठा, प्रचंड आत्मविश्वास आणि लग्नानंतरही पतीने दिलेली मनापासूनची साथ… या सार्‍याच्या जोरावर एका मराठी मुलीनं आकाश मुठीत धरलं. इचलकरंजीच्या दीप्ती स्वागत इरसाले यांनी ‘मिसेस तेलंगणा’ हा मानाचा किताब मिळवला. या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

बेळगावच्या अर्चना आणि डॉ. अनिल शेट्टी यांची कन्या, तसेच इचलकरंजी नगरपालिकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इरसाले यांची सून आणि नामांकित औषध कंपनीचे सीईओ असलेले स्वागत इरसाले यांची पत्नी दीप्ती इरसाले या ‘मिसेस तेलंगणा’ झाल्या. सुरुवातीपासूनच हुशार असलेल्या दीप्ती यांनी आपल्या हुशारीने हा किताब मिळवला. दिल्ली येथे पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातील मुली सहभागी झाल्या होत्या. अतिशय अवघड असलेल्या या स्पर्धेतील प्रत्येक फेरी दीप्ती यांनी जिंकली. ज्युरी असलेल्या मिस इंडिया श्वेता सारडा यांचेही मन जिंकले आणि हा किताब मिळवला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चौफेर यश

बी.ई. झालेल्या दीप्ती यांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये डिप्लोमा केला, शिवाय फेस योगा इन्स्ट्रक्टरही झाल्या. विविध क्षेत्रातील अद्ययावत शिक्षण घेण्याची वृत्ती आणि त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करणार्‍या दीप्ती यांना माहेरसोबत सासरचीही साथ मिळाली. लग्नानंतर त्या हैदराबाद येथे स्थायिक झाल्या. जन्माने मराठी असलेल्या दीप्ती यांनी ‘मिसेस तेलंगणा’ हा मानाचा किताब मिळवला.

Back to top button