अल्पवयीन मुलाच्या अंगात स्वामी समर्थ प्रकटल्याचा बनाव

अल्पवयीन मुलाच्या अंगात स्वामी समर्थ प्रकटल्याचा बनाव

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलगाच्या अंगामध्ये 'स्वामी समर्थ' प्रकट झाल्याचे भासवून भाविकांमध्ये अंधश्रद्धा पसरविणार्‍या पती-पत्नीविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. इंद्रायणी वलादे (वय 36) व हितेश वलादे (37, मूळ रा. कॅम्प एरिया, गडचिरोली) अशी संशयितांची नावे आहेत. मंगळवारी कसबा बावडा परिसरात जयंतीनिमित्त महाप्रसादाचेही आयोजन केले होते.

कसबा बावडा ते कदमवाडी रस्त्यावर असणार्‍या राम चौगले कॉलनीमध्ये वलादे दाम्पत्य जुलै 2023 पासून राहण्यास आहेत. त्यांच्या 15 वर्षीय मुलाच्या अंगामध्ये स्वामी समर्थ प्रकट झाले आहेत, असे ते लोकांना सांगत होते. तसेच 'तुम्ही तुमच्या कुलस्वामीची पूजाअर्चा करा. स्वामींच्या नावाने प्रसाद करून लोकांना वाटप करा. पाच गुरुवारी माझ्याकडे दर्शनाला या' असे मुलाकडून सांगत होते. हा मुलगा स्वामींचा अवतार असल्याचे सांगून अंधश्रद्धेच्या नावाखाली मंगळवारी पारायण व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

पोलिस झाले फिर्यादी…

मंगळवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेतील मुलगा अल्पवयीन व आजारी असल्याचे दिसून आले. याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 चे कलम 2 (1)(ख) मधील 2 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्याद उपनिरीक्षक विश्वास कुरणे यांनी दाखल केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news