फड सांभाळ तुऱ्याला गं आला…! ऊसाला ‘तुरा’ अन् शेतकऱ्यांवर नुकसानीचा ‘फेरा’

फड सांभाळ तुऱ्याला गं आला…! ऊसाला ‘तुरा’ अन् शेतकऱ्यांवर नुकसानीचा ‘फेरा’
Published on
Updated on

विशाळगड; सुभाष पाटील : शाहूवाडी तालुक्यात ऊसाची शेती चांगलीच बहरली आहे. मात्र शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेला हा ऊस आता तोडी अभावी शेतातच पडून राहत आहे. त्यातच ऊसाला तुरे आल्याने वेळेत तोडणी न झाल्यास या ऊसाची चिपाडे होण्याची वेळ येईल. त्यामुळे 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा' अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. निसर्गाच्या लहरी हवामानामुळे ऊसाला तुरे फुटू लागले आहेत. वजन घटण्याची भीती व्यक्त होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

तुरा आल्याने उत्पादनात घट

ऊसाची पूर्ण वाढ झाल्यानंतर विशिष्ट पोषक हवामानामध्ये उसाला तुरा येतो. उसाचे वाण, जमीन, भौगोलिक स्थान, पाऊसमान, मशागत तंत्र, खत, पाणी व तण व्यवस्थापन आदी गोष्टीबरोबर हवामानाच्या प्रभावामुळे उसाला तुरा येतो. उसाला तुरा आल्यानंतर ऊसाची वाढ पूर्णपणे थांबते. तुरा आल्यानंतर काही दिवसात ऊसाची तोडणी झाली नाही तर ऊसाला फुटवे फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होतो. त्यामुळे ऊस शेतात जास्त काळ राहिला तर उत्पादनात मोठी घट सहन करावी लागणार आहे.

ऊसाला तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान

सर्वसाधारणपणे ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात ऊसाला तुरे येतात. दिवसाचे तापमान २६ अंश ते २८ अंश सेल्सिअस व रात्रीचे तापमान २२ अंश ते २३ अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के, साडेबारा तासांचा दिवस आणि साडेअकरा तासांची रात्र, प्रकाशाची तीव्रता १०,००० ते १२,००० फूट कॅन्डल्स अशी परिस्थिती किमान १० ते १२ दिवस सलग मिळाल्यास ऊसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास कारणीभूत असते.

वातावरणातील तापमान जसजसे वाढत जाईल तसे ऊसाचे वजन व साखर उतारा घटून नुकसान होते. ऊसाचे वजन व साखर उतारा टिकून राहणे हे ऊस जातींच्या अनुवंशिक गुणधर्मावर अवलंबून असते.

तुरा येण्यास कारणीभूत घटक

ऊसाची जात

ऊसाच्या सर्व जातीमध्ये तुरा येण्याची क्षमता असते; परंतु जातीनुसार तुरा येण्याच्या प्रमाणात फरक आढळून येतो. काही जातींमध्ये लवकर तर काही जातींमध्ये तुरा उशिरा येतो. तुरा येण्याचे प्रमाण हे त्या जातीच्या अनुवंशिक गुणांवर अवलंबून असते.
को-४१९, को-७२१९, कोसी ६७१ आणि को-९४०१२ या जातींना लवकर तुरा येतो. को-७४०, कोएम- ७१२५, कोएम-८८१२१, को- ८०१४, को-८६०३२, कोएम-०२६५, एमएस- १०००१ आणि को-९२००५ या ऊस जातींना उशिरा तुरा येतो.

तुऱ्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना

  • लागवड शिफारस केलेल्या हंगामात आणि वेळेवर करावी.
  • हंगामानुसार शिफारस केलेल्या जातींची लागवड करावी.
  • लवकर पक्व होणाऱ्या कोसी-६७१, को-९४०१२, व्हीएसआय-४३४, को-८०१४, एमएस-१०००१ या ऊस जातींची तोडणी अगोदर करावी.
  • शिफारस केलेल्या खतांची मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी द्यावी.
  • पाणथळ जमिनीत पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी.
  • नत्राची मात्रा विभागून द्यावी.
  • जुलै/ ऑगस्टमध्ये ऊसाच्या शेतात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

खतांचे वाढलेले दर आणि मजुरांची वानवा पाहता, ऊसाचा उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. त्यातच तुऱ्याचे संकट उभे असल्याने वजन घटीने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे.

– संभाजी पाटील, शेतकरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news