आ. चंद्रकांत पाटील म्हणाले आम्ही हवेत बोलत नाही.. करून दाखवतो

विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधक फसव्या आकड्यांचा दावा करत आहेत. आकड्यांचा दावा करणार्यांनी प्रथम आपल्या पक्षाच्या चिन्हावर किती सदस्य निवडून आले आहेत ते पाहावे. आम्ही हवेत बोलत नाही, करून दाखवतो, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना फटकारले. आकडेवारी पाहिल्यानंतर या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. कोल्हापुरातील आवाडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत अडीच तास खलबते चालली होती. बैठकीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. पाटील म्हणाले, काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेले केवळ 36 सदस्य आहे आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या 105 आहे. यावरून त्यांचे दावे किती खरे आहेत ते दिसून येते. या निवडणुकीचे स्वरूप वेगळे असते. मतदार मर्यादित असतात. मतदानाला अजून वीस दिवस आहेत. त्यामुळे सकाळी तिकडे दिसणारे, सायंकाळी आमच्याकडेही दिसतील. राजकारणात आज तिकडे असणारी व्यक्ती कायमच त्याठिकाणी राहील, असे होत नाही. बदल होत असतो. आज शिरोळ, हातकणंगले तालुक्यात दौरा केला. परिस्थिती चांगली आहे. आम्ही हवेत बोलत नाही, करून दाखवतो.
भाजपला निवडणूक सोपी : आ. कोरे
जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आ. विनय कोरे यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना फटकारले. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रथमच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या स्थानिक पातळीवरील निवडणुका येत्या दोन, तीन महिन्यांत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र कसे राहतील? त्यांना एकमेकांविरोधात लढावे लागणार आहे. त्यामुळे आता जरी सर्व आपल्याबरोबर आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी तशी वस्तुस्थिती नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास वडगाव नगरपालिकेचे देता येईल. तेथील दोन गट एकत्र कसे राहू शकतील? त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक सोपी आहे.
भेटले म्हणजे मत दिले असे नाही : आ. आवाडे
आ. प्रकाश आवाडे म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीमध्ये भाजप आघाडीला वातावरण चांगले आहे. 23 सदस्य आपल्यासोबत आहेत. मतदारांना उमेदवार भेटणारच. त्यामुळे भेटल्यावर लगेत मत दिले किंवा पाठिंबा दिला, असे होत नाही.
बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी खा. धनंजय महाडिक, माजी आ. अमल महाडिक, राहुल चिकोडे, जि.प. सदस्य राहुल आवाडे, प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, समित कदम आदी उपस्थित होते.
दि. 22 किंवा 23 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज
भाजपच्या उमेदवारांची यादी दिल्लीतून जाहीर होते. राज्यातील सर्वच जागांची यादी तयार आहे. दोन दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर होतील. त्यानंतर दि. 22 किंवा 23 नोव्हेंबर रोजी भाजप उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.