honey trap : कोल्हापूरच्या व्यापार्‍याकडून तीन वर्षांत उकळले ३.२६ कोटी | पुढारी

honey trap : कोल्हापूरच्या व्यापार्‍याकडून तीन वर्षांत उकळले ३.२६ कोटी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

हनी ट्रॅपद्वारे ( honey trap ) कोल्हापूरच्या एका प्रख्यात साखर व्यापार्‍याला बदनामीची धमकी देऊन त्याच्याकडे खंडणीची मागणी करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट दहाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी 17 लाख रुपयांची खंडणीची रक्कम घेताना गुरुवारी (दि. 18) रंगेहाथ अटक केली.

( honey trap ) लुबना ऊर्फ सपना वजीर, अनिल ऊर्फ आकाश बन्सीलाल चौधरी आणि मनीष नरेंद्र सोधी अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 49 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे, हिरेजडित दागिने, सात मोबाईल व दोन महागड्या कार जप्त केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी या व्यापार्‍याकडून तीन कोटी 26 लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले. अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात अन्य एका महिलेचा सहभाग उघड झाला असून तिच्याअटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. यातील तक्रारदार मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असून ते एक नामांकित साखर व्यापारी म्हणून परिचित आहेत. 2016 साली ते गोवा येथे गेले होते. तिथेच त्यांची या आरोपीशी ओळख झाली होती. ओळखीनंतर ते सर्वजण चांगले मित्र झाले होते. व्यवसायानिमित्त ते सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होते.

2019 साली मुंबईत एका कामासांठी ते अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी लुबनाने त्यांना जेवणाची ऑफर देत तिच्यासोबत अन्य एका तरुणीला ( honey trap ) आणले होते. ते तिघेही रूममध्ये असताना अन्य एक तरुणी कागदपत्रे देण्याच्या बहाणा करून बाहेर गेली तर दुसरी तरुणी वॉशरूममध्ये लपून बसली होती. थोड्या वेळाने ती तरुणी पुन्हा रूममध्ये आली. यावेळी तिला दुसरी तरुणी अंगावरील कपडे काढून ब्लँकेट गुंडाळून बसली होती.

यावेळी तिने या व्यापार्‍यावर गंभीर आरोप करताना त्यांचे व्हिडीओ मोबाईलवर काढले होते. पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. यामुळे व्यापारी प्रचंड घाबरले. बदनामीच्या भीतीने त्यांची पैशांची मागणी पूर्ण केली. मार्च 2019 ते आतापर्यंत त्यांनी त्यांच्याकडून तीन कोटी 26 लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले. ही रक्कम घेऊनही ते त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करीत होते. पैसे दिले नाहीत तर त्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होते.

सततच्या ब्लॅकमेलला कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिस उपायुक्त निलोत्पल यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्याकडे मदत करण्याची विनंती केली. या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी एसीपी नितीन अलकनुरे यांच्यासह युनिट दहाच्या अधिकार्‍यांना शहानिशा करण्याचे आदेश देऊन दोषी आरोपीविरुद्ध सक्त कारवाईचे आदेश दिले होते. ही शहानिशा सुरू असतानाच या टोळीने पुन्हा त्यांना 18 नोव्हेंबर रोजी कॉल करून त्यांच्याकडे सतरा लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम घेण्यासाठी त्यांना अंधेरीतील कॅफे कॉफी डे हॉटेलमध्ये बोलाविण्यात आले होते. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर, किरण लोंढे, गणेश तोडकर, उत्तम भजनावळे, विजय सांडभोर, वाल्मिक कोरे, अफरोज शेख, संतोष वंजारी यांच्यासह अन्य पोलिस पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून खंडणीची रक्कम घेताना लुबना वजीर, अनिल चौधरी आणि मनीष सोधी या तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीत त्यांनी या गुन्ह्यांची कबुली देताना तक्रारदार व्यापार्‍याकडून गेल्या तीन वर्षांत तीन कोटी 26 लाख रुपये घेतल्याचे सांगितले. ते तिघेही अंधेरीतील रहिवासी असून त्यांच्याकडून पोलिसांनी 29 लाख रुपयांची कॅश, 8 लाख 15 हजार रुपयांचे सोने, हिरेजडित दागिने, 2 लाख 20 हजार रुपयांचे सात मोबाईल, पाच लाख रुपयांची आयव्ही टेक होंडा कार, पाच लाख रुपयांची व्होक्सवॅगन वेंटो कार असा 49 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना गुरुवार, 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात एका महिलेला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर व्यापार्‍यांना हनी ट्रॅपद्वारे अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा आता पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button