कोल्‍हापूर : कागल एमआयडीसीत दुचाकीला अपघात; जवानासह २ जण ठार | पुढारी

कोल्‍हापूर : कागल एमआयडीसीत दुचाकीला अपघात; जवानासह २ जण ठार

कसबा सांगाव; पुढारी वृत्तसेवा कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रेमंड कंपनीच्या पाठीमागील बाजूच्या रोडवर रात्री अपघात झाला होता. या अपघातात मांगुर येथील जवानासह त्यांचा मित्र जागीच ठार झाला. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मांगुर येथून कोल्हापूरकडे कामासाठी दोघेजण मोटरसायकलवरून बाहेर पडले होते. यावेळी कंपाउंडच्या भिंतीला टू व्हीलर जोरात धडकल्याने जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी (वय 25) व त्यांचा मित्र ओंकार विलास जठार (वय 22) यांचा जागीच मृत्यू झाला.

रात्री अपघात केव्हा झाला याची कोणालाही कल्पना नव्हती. पहाटेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीत कामाला आलेल्या तरुणांना सदर घटना निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मांगुर गावात कळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अपघाताचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस हजर झाले असून, या घटनेचा अधिक तपास चालू आहे.

प्रकाश सूर्यवंशी हे बेंगलोर येथे पॅरा कमांडो म्हणून सैन्य दलात कार्यरत होते. 25 नोव्हेंबरला ते सुट्टीसाठी म्हणून गावी आले होते. त्‍यांना पंधरा दिवसांपूर्वीच मुलगा झाला आहे. 28 तारखेला ते पुन्हा रुजू होणार होते. त्यांच्या वडिलांचे निधन लहानपणी झाल्‍याने आईनेच त्‍यांना कष्टाने वाढवले होते. त्यांचा जिवलग मित्र ओमकार जठार हा गावातीलच टेंम्पोवर एमआयडीसी येथे चालक म्हणून काम करत होता. तो अविवाहित होता. दोघांच्या अपघाताची बातमी गावात समजताच गावावर शोककळा पसरली. गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

हेही वाचा :  

Back to top button