Poseidon : कोल्हापुरातील समुद्रदेवता न्यूयॉर्कहून कोरियाकडे; जागतिक तज्‍ज्ञांना मोहिनी | पुढारी

Poseidon : कोल्हापुरातील समुद्रदेवता न्यूयॉर्कहून कोरियाकडे; जागतिक तज्‍ज्ञांना मोहिनी

आशिष शिंदे

कोल्हापूर : कोल्हापूरचा तीन हजार वर्षांपूर्वी रोमन आणि ग्रीक राष्ट्रांशी असलेला व्यापारी व सांस्कृतिक संबंधांचा अस्सल पुरावा असलेला समुद्रदेवतेचा पुतळा अर्थात ‘पोसायडन’ची मोहिनी सातासमुद्रापार पोहोचली आहे. अमेरिकेच्या जगप्रसिद्ध अशा मेट्रोपोलिटन म्युझियम संचालकांनाही याची भुरळ पडली. त्यांनी भारतातून ज्या वस्तू जागतिक अभ्यासकांसाठी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला, यामध्ये समुद्रदेवतेच्या मूर्तीचा आवर्जून समावेश केला. तमाम कोल्हापूरकरांना अभिमान वाटावा, अशा या समुद्रदेवतेची मूर्ती व अन्य प्राचीन कलाकृती न्यूयॉर्कनंतर आता कोरियात पोहोचल्या आहेत.

ब्रह्मपुरी टेकडी येथील उत्खननात सापडेला समुद्रदेवतेचा पुतळा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी कोल्हापूरचे समुद्रमार्गे रोमशी असणारे व्यापारी संबंध अधोरेखित करतो. टाऊन हॉल येथील वस्तुसंग्रहालयातील या पुतळ्यासह व इतर कलाकृती न्यूयॉर्क येथील मेट म्युझियम, नंतर कोरिया येथील वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापुरात सापडलेल्या या प्राचीन कलाकृतींचे परदेशातील प्रदर्शन कोल्हापूरचा समृद्ध प्राचीन वारसा जगासमोर आणत आहे.

न्यूयॉर्क येथील मेट म्युझियमचे काही अधिकारी सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्यासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी टाऊन हॉलला भेट दिली. या वस्तुसंग्रहालयात असणारा समुद्रदेवाचा पुतळा पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तीन हजार वर्षांपूर्वीचा कोल्हापूरचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जागतिक अभ्यासकांसमोर यावा, अशी भूमिका त्यांनी आवर्जून मांडली. यातूनच हा पुतळा न्यूयॉर्क येथील प्रदर्शनात ठेवण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी असणारी अत्यंत किचकट कायदेशीर प्रक्रिया दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयामार्फत पूर्ण करण्यात आली आणि प्रदर्शनात मांडून परत आहे त्या स्थितीत देण्याच्या अटीवर समुद्रदेवाचा सातासमुद्रापार प्रवास सुरू झाला.

मेट म्युझियममध्ये 17 जुलै ते 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत हा पुतळा ठेवण्यात आला होता. न्यूयॉर्क येथील प्रदर्शनानंतर समुद्रदेवाच्या पुतळ्यासह इतर कलाकृती कोरिया येथील वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

Back to top button