कोल्हापुरात भरधाव कारने 7 जणांना उडवले, चौघांचा मृत्यू; जाणून घ्या नेमके घडले (Video)

कोल्हापुरात भरधाव कारने 7 जणांना उडवले, चौघांचा मृत्यू; जाणून घ्या नेमके घडले (Video)

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अत्यंत गजबजलेल्या सायबर चौकात सोमवारी दुपारी भीषण अपघाताने कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधार सॅन्ट्रो कारने सातजणांना चिरडले. यात तीन दुचाकींना उडविले. दुचाकीवरील एक युवक फुटबॉलसारखा उडून सुमारे 50 फुटांवर जाऊन पडला. अपघातात चालक शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व्ही. एम. चव्हाण आणि दोन सख्ख्या भावांसह चौघे ठार झाले; तर चौघेजण जखमी झाले.

चालक चव्हाण यांना कार चालविताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असण्याची किंवा चक्कर आली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. नियंत्रण सुटून ब्रेकवर पाय पडण्याऐवजी अ‍ॅक्सिलेटरवर पाय पडून कार सुसाट पुढे जाऊन अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच चव्हाण यांच्या उजव्या डोळ्यावर उपचार झाले असल्याने बँडेजची पट्टी होती.

चालक व्ही. एम. चव्हाण तथा वसंत मारुती चव्हाण (वय 72), हर्षद सचिन पाटील (16), प्रथमेश सचिन पाटील (19 सर्व रा. कोल्हापूर), अनिकेत आनंद चौगले (रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा) यांचा मृतात समावेश आहे. धनाजी शंकर कोळी (44) आणि त्यांची पत्नी शुभांगी धनाजी कोळी (38, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) व त्यांचा नातू समर्थ पंकज पाटील (वय 1 वर्ष), मयूर मारुती खोत (रा. चांदेकरवाडी, ता. राधानगरी) आदी जखमी झाले आहेत.

चालक चव्हाण हे सोमवारी दुपारी सॅन्ट्रो (एमएच 09 बीएम 2892) कारने शिवाजी विद्यापीठमार्गे राजारामपुरीकडे जात होते. त्यावेळी सायबर चौकातील सिग्नल बंद होता. सायबर चौकाच्या अलीकडे चव्हाण यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार अत्यंत वेगाने धावू लागली. चौकात दुचाकींची मोठी गर्दी होती. तसेच दुपारची वेळ असल्याने सायबर आणि शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, नागरिक पायी ये-जा करत होते. सायबर चौकातील सिग्नलजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवरून उडून चव्हाण यांची कार काही सेकंदांत भरधाव गेली. कारने तीन दुचाकींना उडविले.

कारच्या धडकेत दुचाकीवरील काहीजण उडून इतरत्र रस्त्यावर पडले. हर्षद पाटील हा तर तब्बल 50 फूट लांब उडून पडला. सायबर चौकातील राजारामपुरीकडे जाणार्‍या रस्त्यावर डाव्या बाजूला असलेल्या सिग्नलचा खांब आणि पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम (पी.ए.एस.)च्या खांबाला कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, दोन्ही खांब काँक्रिटमधून निखळून तुटले. दोन्ही खांबांना धडक दिल्यानंतर कार थांबली आणि त्याच ठिकाणी उलटली.

मृत हर्षद पाटील हा नुकताच दहावी पास झाला आहे. त्याचा सख्खा भाऊ प्रथमेश पाटील व आतेभाऊ जयराज संतोष पाटील (19) एकत्र होते. जयराज आयटीआय झाला असून औद्योगिक वसाहतीत नोकरी करतो. आज सोमवार असल्याने जयराजला सुट्टी होती. त्यामुळे दुपारी जयराज आणि प्रथमेश एका दुचाकीवरून नाष्टा करण्यासाठी जात होते. त्याचवेळी हर्षदही त्यांच्यामागे लागला. मीसुद्धा नाष्टा करण्यासाठी येणार, असा हट्ट त्याने धरला. तोपर्यंत चव्हाण यांच्या कारने तिघांनाही उडविले.

चिमुकल्याचे दैव बलवत्तर…

कणेरीवाडीतील धनाजी कोळी व शुभांगी कोळी हे नातू समर्थ याला घेऊन अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जात होते. सायबर चौकातून जात असताना चव्हाण यांच्या नियंत्रण सुटलेल्या कारने त्यांनाही धडक दिली. त्यात कोळी दाम्पत्याची दुचाकी खाली पडली. समर्थसह कोळीही खाली पडले. मात्र धनाजी कोळी यांनी रस्त्यावर पडलेल्या समर्थला तत्काळ उचलून मिठीत घेतले. एवढ्या मोठ्या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून चिमुकल्याचा जीव वाचला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news