आजरा साखर कारखान्यासाठी 61 टक्के मतदान | पुढारी

आजरा साखर कारखान्यासाठी 61 टक्के मतदान

आजरा, पुढारी वृत्तसेवा : गवसे येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी 60.68 टक्के मतदान झाले. 20 जागांसाठी कारखाना अध्यक्ष सुनील शिंत्रे, माजी अध्यक्ष अशोक चराटी, संचालिका अंजना रेडेकर, मुकुंदराव देसाई, विष्णुपंत केसरकर, उमेश आपटे, वसंतराव धुरे या प्रमुखांसह 46 जणांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मंगळवारी (दि. 19) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

‘अ’ वर्गासाठी 77 केंद्रांवर तर ‘ब’ वर्गासाठी 12 केंद्रांवर मतदान झाले. 32 हजार 700 पैकी 19 हजार 388 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात मतदारांमध्ये मतदानासाठी उदासीनता दिसून आली.

दोन्ही राष्ट्रवादीप्रणीत रवळनाथ शेतकरी विकास आघाडी आणि भाजप, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणीत श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी यांच्यात लढत झाली. माघारी दिवशी श्री चाळोबा देव विकास आघाडीचे भटक्या विमुक्त गटातील संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी आघाडीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रचारसभा घेतल्या तर श्री चाळोबा देव आघाडीसाठी आमदार सतेज पाटील यांनी प्रचारसभा व पत्रकार बैठका घेतल्या. सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदारांना घरातून बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू होती. सकाळपासून सायंकाळी पाचपर्यंत मतदार आणण्यासाठी कार्यकर्त्यांची जोरदार धडपड सुरू होती. विविध वाहनांमधून बाहेरचे मतदार आणले जात होते. वृद्धांना आणण्यासाठी गावागावांत वाहनांचा मोठा वापर केला. दुपारी बारापर्यंत पेरणोली, भादवण, देवर्डे, गजरगाव या मोठ्या केंद्रांवर पन्नास टक्के मतदान झाले.

कारखाना कर्जबाजारी असल्याने निवडणुकीबाबत मतदारांमध्ये उदासीनता जाण़वत होती; परंतु मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. आजरा शहरात दोन्ही आघाडींनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी चुरस केली. व्यंकटराव हायस्कूलच्या केंद्रावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी दोनपर्यंत 40 टक्के मतदान झाले. मतदारांमध्ये उदासीनता असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे कार्यकर्ते मतदारांना घरातून बाहेर काढत होते.

कर्मचार्‍याला चक्कर

पेरणोली येथील हायस्कूलमधील केंद्रावर कर्मचारी सतीश पाटील यांना सकाळी चक्कर आल्याने खाली कोसळले. यामुळे धावपळ उडाली.

Back to top button