शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन मंडळावर निपुण कोरे यांची नियुक्ती | पुढारी

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन मंडळावर निपुण कोरे यांची नियुक्ती

वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : येथील श्री वारणा सहकारी बँकेचे व कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष व दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. फेडरेशन मुंबईचे संचालक निपुण विलासराव कोरे यांची महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन मंडळावर सहकार क्षेत्रातील बँकिंग तज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे.

वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी दिलेला सहकाराचा मंत्र व केलेले मागदर्शन आत्मसात करून सहकाराच्या माध्यमातून समाजातील सामान्य शेतकरी, कष्टकरी, नोकरदार व व्यावसाईक यांच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास त्यांना अगदी सुरुवातीपासून आहे.

वारणा सहकारी बँक व कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांच्या अनेक अडचणी राज्य सरकार, केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे मांडून त्या सोडवून सभासद, बँकांच्या हिताची अनेक कामे पूर्ण करून योगदान दिले आहे. यापूर्वी निपुणराव कोरे यांचे वडील व वारणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. विलासराव विश्वनाथ कोरे यांनी शिवाजी विद्यापीठावर राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते. कोरे यांच्या निवडीमुळे विद्यापीठाला बँकिंग अभ्यासक्रमासाठी उपयोग होणार आहे. त्यांची ही निवड म्हणजे बँकिंग क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट असून, त्यांनी आजवर बँकिंग क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कार्याची पोच पावतीच म्हणावी लागेल.

Back to top button