‘बिद्री’चा राज्यात उच्चांकी प्रतिटन 3407 रु. दर जाहीर

‘बिद्री’चा राज्यात उच्चांकी प्रतिटन 3407 रु. दर जाहीर

बिद्री, पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने उसाला उच्चांकी प्रतिटन 3 हजार 407 रुपये दर जाहीर केला आहे. संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीनंतर नूतन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी ही माहिती दिली. प्रारंभी 65 हजार लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे पहिले बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

या प्रकल्पाचे पूजन संचालक प्रवीणसिंह पाटील व सौ. सुहासिनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्या. संचालक मंडळाच्या बैठकीत ऊस दराची घोषणा अध्यक्ष पाटील यांनी केली. हा ऊस दर राज्याच्या साखर कारखानदारीतील सर्वाधिक असणार आहे.

अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, यंदा 3407 रुपये असा उच्चांकी दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याची एफआरपी प्रतिटन 3194 रुपये 29 पैसे बसते. त्यामुळे प्रशासनाने दर 3200 रुपये जाहीर केला होता. त्यामध्ये अधिक टनास 207 रुपये देण्यात निर्णय घेण्यात आला आहे. सध्या उसाला प्रतिटन 3200 रुपयेप्रमाणे देण्यात येणार असून गळीत हंगाम समाप्तीनंतर दोन टप्प्यात उर्वरीत रक्कम देण्यात येणार आहे. ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्याला अधिकाधिक उस पुरवठा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी नूतन उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, चीफ अकौंटंट एस. ए. कुलकर्णी, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

logo
Pudhari News
pudhari.news