कोल्हापूर : व्हॉल्व्हमधून गळती; लाखो लिटर पाणी वाया | पुढारी

कोल्हापूर : व्हॉल्व्हमधून गळती; लाखो लिटर पाणी वाया

कोल्हापूर,  पुढारी वृत्तसेवा : संभाजीनगर परिसरातील निर्माण चौक येथील पाण्याचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने गुरुवारी लाखो लिटर पाणी वाया गेले. चक्क पिण्याचे पाणी रस्त्यावरून पाटासारखे वाहत होते. याला पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा अकार्यक्षमपणा कारणीभूत असल्याचा आरोप करून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

संभाजीनगर, निर्माण चौकातून पुढे 1100 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे. जलवाहिनीला निर्माण चौकात असलेला व्हॉल्व्ह बुधवारी नादुरुस्त झाला होता. व्हॉल्व्ह काढून दुरुस्तीसाठी देण्यात आला होता. गुरुवारी दुपारी या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर चारच्या सुमारास व्हॉल्व्हच्या ठिकाणी झापडी नसल्याने त्यातून धो धो पाणी वाहू लागले. सुमारे तासभर लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाया गेले. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने ये-जा करणार्‍या नागरिकांनी त्याचे फोटो, व्हिडीओ करून सोशल मीडियावर टाकले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांना जाग आली. व्हॉल्व्हची झापडी बसविण्यासाठी अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली. व्हॉल्व्ह दुरुस्त झाल्यानंतर पाणी थांबले.

दरम्यान, शिंगणापूर योजनेवरील पुईखडी ते राजारामपुरीकडे जाणारी 1100 मि.मी. व्यासाच्या शुद्ध जलवाहिनीवरील निर्माण चौककडून जरग नगरकडे जाणार्‍या दहा इंची लाईनवरील क्रॉस करणारा व्हॉल्व्ह तांत्रिक कारणामुळे नादुरुस्त झाला होता. व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी 1100 मि.मी. व्यासाची पाईपलाईन रिकामी केल्याशिवाय दुरुस्ती शक्य नव्हती. त्यासाठी पाईपलाईन रिकामी करून व्हॉल्व्ह दुरुस्त करताना त्यातील पार्टस् काढावे लागले. त्यामुळे पाईपलाईनमधील शिल्लक पाणी नैसर्गिक प्रवाहाने बाहेर आले. याबाबत तात्काळ नियोजन करून पाणी बंद करून व्हॉल्व्ह दुरुस्त करून घेण्यात आला आहे, असे महापालिकेने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Back to top button