कोल्हापूर : वाठारच्या उपसरपंचपदी महेश कुंभार बिनविरोध | पुढारी

कोल्हापूर : वाठारच्या उपसरपंचपदी महेश कुंभार बिनविरोध

किणी, पुढारी वृत्तसेवा : वाठार तर्फ वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राहुल पोवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष सभा बोलाविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी मंडलाधिकारी अमित लाड होते.

फेब्रुवारी २०२१ मध्ये वाठार तर्फ वडगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, बी. एस.पाटील, उद्योजक शरद बेनाडे यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान युवा शक्तीचे आठ उमेदवार, सूर्यकांत शिर्के, सुहास पाटील, नानासो मस्के यांच्या नेतृत्वाखालील संत गोरोबाकाका कुंभार पॅनेलचे सहा तर पी.डी. पाटील, काशिनाथ भोपळे यांच्या नेतृत्वाखालील वाठार विकास समितीचा एकमेव उमेदवार निवडून आला होता.

सरपंचपद अनुसुचित स्त्री प्रवर्गासाठी राखीव होते. पुरेसे संख्याबळ असुनही जय हनुमान युवा शक्तीकडे सरपंचपदासाठी व्यक्ती नसल्याने त्यांनी वाठार विकास समितीच्या तेजस्विनी वाठारकर यांना पाठिंबा देत आपल्या गटात सहभागी करून घेऊन त्यांना सरपंचपदाची संधी दिली. तर राहुल पोवार याना उपसरपंच केले. मात्र, काही अंतर्गत बाबीमुळे दोन्ही गट एकत्र येऊन सरपंच तेजस्विनी वाठारकर व उपसरपंच राहुल पोवार यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. तत्पूर्वीच राहुल पोवार यांनी राजीनामा दिला. तर २५ ऑक्टोबरला सरपंच, उपसरपंचाविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला.

दरम्यान सरपंच वाठारकर यांनी विश्वास ठरावाविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल केल्याने सरपंचपद न्यायप्रकियेत अडकले. मात्र, उपसरपंचपद रिक्त असल्याने ग्रामविकास अधिकारी यांच्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी १३ डिसेंबररोजी उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलविण्याचे आदेश दिले होते. या सभेत महेश कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी अमित लाड व ग्रामविकास अधिकारी डी.डी. शिंदे यांनी काम पाहिले.

हेही वाचा 

Back to top button