कोल्हापूर : शिरोळच्या अमृता पुजारीने मिळवला महाराष्ट्र केसरीचा किताब

कोल्हापूर : शिरोळच्या अमृता पुजारीने मिळवला महाराष्ट्र केसरीचा किताब
Published on
Updated on

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथे आज (दि. १२) झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिरोळच्या अमृता शशिकांत पुजारी हिने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. इतिहासात प्रथमच अमृताच्या रूपाने महाराष्ट्र केसरी किताब मिळाल्याने शिरोळकरांनी साखर पेढे वाटून व फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला.

गेली अनेक वर्षे पैलवान अमृता पुजारी ही मुरगुड येथील सदाशिव मंडलिक कुस्ती केंद्रात सराव करीत आहे. तिने राज्य व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करून अनेक पदके प्राप्त केली होती. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रतीक्षा बागडीकडून तिला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता त्यावेळी ती उपमहाराष्ट्र केसरी ठरली होती. पण निराश न होता महाराष्ट्र केसरी किताब मिळवायचंच ही जिद्द मनाशी बाळगलेली होती. तिने पुन्हा जोमाने वर्षभर सराव करीत विविध स्पर्धेत भाग घेऊन यश प्राप्त करीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चटकदार कामगिरी केली.

चंद्रपूर येथे आज (दि. १२) महाराष्ट्र केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी पै. प्रतीक्षा बागडी विरुद्ध पै. अमृता पुजारी यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीमध्ये पै. अमृता पुजारीने प्रतीक्षा बागडीवर ३-२ गुणाने मात करून गेल्या वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढत महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला.

शिरोळच्या इतिहासात प्रथमच पै. अमृता पुजारी हिच्या रूपाने महाराष्ट्र केसरी किताब प्राप्त झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. शिवाजी चौकासह शहरातील प्रमुख चौकात फटाक्याची आतिषबाजी करून साखर-पेढे वाटत जल्लोष साजरा केला. अमृता पुजारी हिला प्रशिक्षक दादासो लवटे, वडील शशिकांत पुजारी, आई मनीषा पुजारी, आजोबा देवाप्पा पुजारी, चुलते बबन पुजारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली आहे.

माझ्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कठोर परिश्रम घेऊन महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला आहे. पुजारी परिवाराबरोबर गावाचे व कोल्हापूरचे नाव मोठे केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
– शशिकांत पुजारी, अमृता पुजारी हिचे वडील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news