उदय सामंत म्हणाले वसतिगृहे आठ दिवसांत सुरू होतील | पुढारी

उदय सामंत म्हणाले वसतिगृहे आठ दिवसांत सुरू होतील

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील वसतिगृहे सुरू करण्याबाबत डॉ. धनराज माने व डॉ. अभय वाघ यांची समिती नेमली आहे. त्यांनी सर्व विद्यापीठांचा आढावा घेतला आहे. येत्या आठ दिवसांत वसतिगृहे सुरू होतील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.

कोल्हापूर दौर्‍यावर असताना ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, प्राध्यापक भरती प्रक्रियेचा 2088 पदांचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. तीन हजारांहून अधिक पद भरतीची मागणी केली होती. दुसर्‍या टप्प्यात एक हजार प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी नाराज होऊ नये. ‘सीएचबी’ प्राध्यापकांना चांगले वेतन कसे देता येईल, यासाठी समिती नियुक्त केली आहे. लवकरच ‘सीएचबी’ प्राध्यापकांंच्या मागण्या पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जाईल.

पन्हाळासह इतर किल्यांवर युवक-युवतींनी नावे कोरल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले, गडकिल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर पोहोचणे काळाची गरज आहे. गडकिल्ल्यांची निगा राखली पाहिजे. याबाबत सर्व जिल्हाधिकार्‍यांना सूचना करणार आहे.

एसटी कर्मचार्‍यांनी टोकाची भूमिका घेऊ नये

संपकरी एसटी कर्मचार्‍यांनी टोकाची भूमिका न घेता चर्चेसाठी आले पाहिजे. यातून मार्ग निघू शकतो. एसटी कर्मचार्‍यांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे सरकार शंभर टक्के उभे आहे. आंदोलनामुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत, याचे भान कर्मचार्‍यांनी ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर विधान परिषदेसाठी विरोधी पक्षाकडे किती तगडा उमेदवार आहे हे माहीत नाही. मात्र महाविकास आघाडीचे सतेज पाटील हे तगडे उमेदवार असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राज्य सरकारने 50 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यामधील 3 कोटी रुपये मिळाले आहेत. विद्यापीठाचे हीरक महोत्सवी वर्ष सुरू झाले तरी उर्वरित निधी मिळालेला नाही, हे निदर्शनास आणून देताच याबाबत दोन दिवसांत विद्यापीठ प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी सांगितले.

Back to top button