कोल्हापूरवर दरवर्षी राहणार महापुराची टांगती तलवार | पुढारी

कोल्हापूरवर दरवर्षी राहणार महापुराची टांगती तलवार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महामार्गावर शिरोली ते पंचगंगा पूल या मार्गावर भरावामुळे सध्या असणारी उंची आणि नव्याने वाढवण्यात येणारी उंची, यामुळे कोल्हापूर आणि परिसरातील गावे दरवर्षी पावसाळ्यात पाण्यात राहणारच. त्याबरोबरच दरवर्षी महापुराची टांगती तलवार कोल्हापूरवासीयांच्या डोक्यावर राहणार आहे. महामार्गाची उंची भराव टाकून वाढवली जाईल. महामार्ग प्राधिकरण आपली जबाबदारी झटकून मोकळे होईल. मात्र, त्यामुळे दरवर्षी कोल्हापूरच्या होणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल आहे.
राजाराम बंधार्‍यावरील पाण्याचा विसर्ग आणि पाणी पातळी याचा विचार करता पंचगंगेचा विसर्ग 60 हजार क्यूसेक पुढे गेला तर पाणी पातळी 41 फुटांवर असते. त्यापुढे 43 फुटांवर पंचगंगेची धोका पातळी आहे. पंचगंगेचे पाणी 60 हजार क्यूसेक पुढे वाढले, तर महामार्गावर त्याला अडथळा सुरू होतो. त्यानंतर पाणी वाढेल, तसे पातळी वाढते. वाढलेले पाणी शहरात पसरण्यास सुरू होते. पंचगंगेची पातळी 48 च्या पुढे गेल्यानंतर महामार्गावरून पाणी पुढे जायला लागते. याचा अर्थ महामार्गामुळे शहरातील पुराच्या पातळीत पाच-सहा फुटांची सहज वाढ होत असते.
महापुरामुळे कोल्हापूरचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. केवळ पूरग्रस्त भागालाच फटका बसतो असे नाही. महापुराने कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेलाही झटका बसतो. पूरग्रस्त भागातील राहती घरे, दुकाने, व्यवसाय, व्यापार या सर्वांचे मोठे नुकसान होते. त्याबरोबर शहरातील उद्योग, व्यापारावर मोठा परिणाम होतो. कोल्हापूर शहरातील तसेच शहरालगतचे अनेक कारखाने, उद्योग प्रसंगी बंद ठेवावे लागतात. उत्पादन ठप्प होते. ते सर्व पूर्वपदावर येण्यासाठी महिना-दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
वर्षभरातून एकदा येणार्‍या महापुराने कोल्हापूरचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा सुमारे दोन हजार कोटींहून अधिक नुकसान होते, असा अंदाज आहे. या नुकसानीमुळे होणारे शारीरिक, मानसिक परिणाम तर वेगळेच आहेत. यापूर्वी आलेल्या महापुराने एक कोटीचे नुकसान झाल्याने एका व्यापार्‍याचा महापुरातच हदयविकाराने मृत्यू झाला होता. अशी अनेक उदाहरणे यानिमित्ताने सांगता येतील.
(समाप्त)
महामार्ग प्राधिकरणाचा नेमका हेतू तरी काय?
गेल्या काही वर्षांचा विचार करता, 2005, 2006 या दोन वर्षी यानंतर 2019 व 2021 या वर्षी कोल्हापूरने महापुराची भीषणता अनुभवली आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी ती तीव्र होतानाच दिसली आहे. 2005 पासूनचा विचार केला, तर महामार्गावर भराव टाकल्याने ही कोल्हापूर शहरात ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यावेळी त्याकडे तितक्या गांभीर्याने पाहिले नाही. आता तर आहे, त्या पेक्षा अधिक उंची वाढवून कोल्हापूरकरांना मरणाच्या दारात नेण्यामागे महामार्ग प्राधिकरणाचा नेमका हेतू तरी काय? असा सवाल कोल्हापूरकर विचारत आहेत.

Back to top button