A. Y. Patil : बिद्री निवडणुकीत घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत ‘ए. वाय’ यांचा मोठा खुलासा | पुढारी

A. Y. Patil : बिद्री निवडणुकीत घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत 'ए. वाय' यांचा मोठा खुलासा

सरवडे: पुढारी वृत्तसेवा : मागील ५ ते ६ वर्षे आपल्याला व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. पण पक्ष संघटना मजबूत व टिकावी म्हणून प्रत्येक वेळी माघार घेतली. आपण नेहमीच पक्षाच्या वरिष्ठांचे नेतृत्व व त्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली. पण बिद्रीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला व माझ्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवण्याचे प्रयत्न दिसले. मुदाळच्या सभेत के. पी. पाटील हेच चेअरमन असावेत, अशी ग्वाही दिली असतानाही त्यांनी कधी जुळवून घेतले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची घुसमट व सन्मानासाठी आपण वेगळी भूमिका घेतल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केला. (A. Y. Patil)

सोळांकूर (ता. राधानगरी ) येथील यशवंतराव पाटील शिक्षण संकुलामध्ये घेण्यात आलेल्या बिद्रीच्या सभासदांच्या आभार मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी रंगराव मगदूम होते. (A. Y. Patil)

ए. वाय. पाटील म्हणाले की, राधानगरी तालुक्यात आपल्याला वगळण्यासाठी के. पी. पाटील यांनी इतरांच्या गाठीभेटीवर अधिक भर दिला. आपल्यातील काही लोकांना आपण भरभरून दिले, तेच लोक सोडून गेले. आपली होणारी घुसमट व डावलण्याचे पक्षाध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांना वारंवार समजावून सांगितले. पण त्यांनीही आपल्यालाच दाबण्याचा व पुढे बघू, हा प्रयत्न केला. नेहमीच आपल्याला मागे खेचण्यासाठी प्रयत्न केले. सहकार हे पक्षीय राजकारण नसून ते गटातटाचे विशिष्ट मुद्द्यावर असते. निवडणुकीत हार -जीत, सत्ता महत्त्वाची नसून आपण कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. A. Y. Patil

बिद्रीचे माजी संचालक नेताजीराव पाटील, बाजार समितीचे सदस्य शिवाजीराव पाटील, सुरेश पाटील, प्रकाश पोवार, बी. एस. पाटील, संभाजी देसाई, बाळासो धोंड, भिकाजी चौगले, प्रभाकर पाटील आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बिद्रीचे माजी संचालक युवराज वारके, आर. वाय. पाटील, बाजार समितीचे सदस्य शरदराव पाटील, भगवान पातले, वाय. डी. पाटील, एकनाथ पाटील, बबन जाधव, सचिन पाटील, बाळासो पाटील, संदीप मगदूम, नामदेव चौगले, तानाजी चव्हाण, सुरेश देवर्डेकर, जे. के. पाटील आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामराव इंगळे यांनी स्वागत केले. तर नाना पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचा 

Back to top button