Kolhapur : महापुराच्या पाणी वहनाला भरावाचा अडथळा | पुढारी

Kolhapur : महापुराच्या पाणी वहनाला भरावाचा अडथळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरच्या महापुराचे पाणी वहनाला पुणे-बंगळूर महामार्गावरील शिरोली ते पंचगंगा पूल या परिसरातील भराव अडथळा ठरत आहे. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगने गेल्या काही वर्षांपासून केलेल्या अभ्यासात हे निरीक्षण नोंदवले आहे. यामुळे नव्याने भराव तर नकोच; पण आहे तो भरावही काढून टाकण्याची गरज आहे. (Kolhapur)

कोल्हापूर शहराला 2019 व 2021 रोजी महापुराचा मोठा फटका बसला. प्रत्यक्ष महापुराचा फटका बसलेल्या नागरिकांसह अप्रत्यक्षही व्यवसाय, व्यापार, उद्योग आदी क्षेत्रांतही कोट्यवधी रुपयांची हानी झाली. जिल्ह्यात दरवर्षी पंचगंगेची पाणी पातळी सरासरी 41-42 फुटांपर्यंत जाते. 43 फूट ही धोका पातळी ओलांडल्यानंतर महापुराची तीव्रता वाढत जाते.

असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगने 2019 व 2021 मधील महापुरातील आकडेवारीचा अभ्यास केला. जलसंपदा विभागाकडूनही जी माहिती उपलब्ध झाली त्यावरून पंचगंगेवरील राजाराम बंधार्‍यावर पाण्याचा विसर्ग 60 हजार घनमीटर प्रतिसेकंद इतका असतो, त्यावेळी पाणी पातळी 41 फुटांपर्यंत असते, हे समोर आले. त्यापुढे प्रत्येक 100 घनमीटर विसर्ग वाढल्यास एक इंच पाणी पातळी वाढत आहे. 2019 व 2021 मध्ये राजाराम बंधार्‍यावरील पाणी पातळी 55 फूट 9 इंचांपर्यंत गेली, त्यावेळी विसर्ग 75 हजार घनमीटर इतका होता.

या सर्वाचा अर्थ शहराच्या पूर्वेकडील बाजूस असणार्‍या शिरोली पुलाखालून ठराविक मर्यादेच्या वर म्हणजे, अंदाजे 60,000 घनमीटर प्रतिसेकंदपेक्षा जास्त विसर्ग वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरातील आणि शहराचे लगतचे पश्चिम बाजूचे पूर प्रवाहाचे विरुद्ध दिशेला असणार्‍या गावांमध्ये पुराच्या पाण्याची पातळी वाढून पाणी नागरी वस्ती व शेतीमध्ये शिरून अतोनात नुकसान होते.

कृष्णा नदीला महापूर आल्यास त्याचा परिणाम पंचगंगा नदीच्या वाहन क्षमता व गतीवर होतो. त्यामुळे पुराची पातळी लवकर कमी होत नाही. जागतिक तापमानवाढ व हवामान बदलामुळे बदललेल्या पर्जन्यमान स्वरूप पाहता पूर निषिद्ध व नियंत्रण क्षेत्रात अडथळा निर्माण होऊन पुराचे वेळी नदीची वाहन क्षमता व पाण्याची गती कमी होणार नाही, अशीच बांधकाम पद्धत म्हणजे पिलर टाकून पूल उभारणे गरजेचे आहे.

Kolhapur : महामार्गावरील भराव उखडून टाकू

कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. भराव टाकून पूल बांधण्यास आमचा विरोध असून, भराव टाकण्याचे काम ताबडतोब थांबवावे; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा भराव टाकला, तर तो उखडून टाकू, असा इशारा शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे यांनी दिला. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांना निवेदन दिले.

पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्व मंत्री, खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शिरोलीपासून भराव न टाकता पिलर उभा करून पूल करावा, अशी सूचना केली होती. त्याकडे दुर्लक्ष करत भराव टाकण्याचे काम सुरू आहे. त्याला कोल्हापुरातून तीव्र विरोध सुरू झाला. शेतकरी संघटनेच्या वतीने भराव टाकण्यास विरोध करून भराव टाकल्यास तो उखडून टाकण्याचा इशारा दिला आहे.

महामार्गावर शिरोली ते पंचगंगा नदी हा मार्ग भराव टाकून उंच केला जाणार आहे. यामुळे महामार्गाची उंची वाढणार असल्यामुळे शहराला पुराचा धोका आणखी वाढणार आहे. 2003 पूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही महापूर आला नव्हता. परंतु, पुणे- बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना भराव टाकण्यात आल्याने रस्त्याची उंची दहा फुटाने वाढली. त्यामुळे शहराला महापुराचा फटका बसला. 2019 व 2021 मध्ये कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला. सहापदरीकरण करताना भराव टाकून रस्त्याची उंची वाढविल्यास महापुरात शहर पाण्याखाली जाणार आहे. परदेशाप्रमाणे भारतातही रस्ते विकासाचे उच्च तंत्रज्ञान विकसित असताना त्याचा वापर सरकार का करत नाही? पूरप्रवण क्षेत्रात पिलरवर पूल करणे आवश्यक असताना सरकार जाणूनबुजून भराव टाकून कोल्हापूरला सापत्नपणाची वागणूक देत आहे. हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे सांगली फाटा ते उचगाव दरम्यानच्या महामार्गावर भराव न टाकता पिलरवर पूल करावेत; अन्यथा संघटनेच्या वतीने हा भराव उद्ध्वस्त केला जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button