कोल्हापूर : सोयाबीनच्या दरात वाढ; मात्र आवक कमीच | पुढारी

कोल्हापूर : सोयाबीनच्या दरात वाढ; मात्र आवक कमीच

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मागील महिन्यात निम्म्यावर आलेला सोयाबीनचा दर आता वधारू लागला आहे. मागील वर्षी याच महिन्यात साडेअकरा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेलेला सोयाबीनचा दर साडेपाच हजारांवर ऑक्टोबर महिन्यात खाली आला होता. आता यामध्ये एक हजार रुपयांची वाढ झाली असली तरी सोयाबीनची आवक अजून कमी आहे.

सोयाबीनचे भाव पूर्ववत झाल्याशिवाय विक्रीसाठी वाट पाहण्याची तयारी शेतकर्‍यांनी केली आहे. जिल्ह्यात साधारण 40 हजार हेक्टरवर सोयाबीनचे पीक घेतले जाते. हेक्टरी सरासरी 25 क्विंटल इतके उत्पादन मिळते. कोल्हापुरात जून महिन्यात 8,500 रु. प्रति क्विंटल दर सोयाबीनला होता. तो जुलै महिन्यात 8 हजार झाला.

दर महिन्याला सुमारे पाचशे रुपयांची गिरावट होऊन ऑक्टोबर महिन्यात तो साडेपाच हजारांपर्यंत खाली आला. नोव्हेंबर महिन्यात थोडी वाढ झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला बाजारात उठाव नव्हता. यातच पावसामुळे उत्पादनात तर घट झालीच होती पण दर्जाही ढासळल्याने दर घटत होते. सोयाबीनचे दर कमी असतानाही आणि आता वाढल्यानंतरही शेतकर्‍यांनी विक्री बाबतीत संयम बाळगला असला तरी यंदाच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन कमी आहे.

आर्दता कमी करण्याची गरज

सोयाबीनची मळणी झाली की शेतकर्‍यांनी भाव नसल्यामुळे सोयाबीनच्या साठवणुकीवर भर दिला होता. आता ऊस तोडणी आणि मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत.

तसेच, दिवसाला सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र, साठवणूक केलेल्या सोयाबीनला ऊन देऊन त्याच्यामधील आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांवर आणणे गरजेचे आहे. तर, योग्य दरही शेतकर्‍यांना मिळणार आहे.

Back to top button