कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : तीन राज्यांत भाजपच्या विजयाने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेची एक जागा भाजपला मिळालीच पाहिजे यावर कार्यकर्ते आग्रही आहेत. नेत्यांकडे आग्रही भूमिका मांडण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगून भाजपकडे सक्षम उमेदवार असल्याचे अधोरेखित केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागा या शिवसेना भाजप युतीने जिंकल्या. जागा वाटपात या दोन्ही जागा शिवसेनेकडे गेल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पट्ट्यात शिवसेनेने घवघवीत यश मिळवले. राज्याच्या बदललेल्या राजकारणात कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून शिंदे गटात प्रवेश केला.
या राजकीय घडामोडी होत होत्या त्यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित केला होता. एवढेच नव्हे तर 2024 च्या निवडणुकीत उमेदवारीची हमीही त्यांनी भाजपच्या नेत्यांकडून घेतली होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे मंडलिक आणि माने हे उमेदवारीवर ठाम आहेत.
या दोन्ही जागा शिवसेना भाजप युतीच्या म्हणून निवडून आल्या होत्या. जागा वाटपात शिवसेनेला संधी मिळाली मात्र त्यांच्या विजयात भाजपचे योगदान आहे. आता जागा वाटपाची चर्चा होताना एक जागा भाजपला मिळालीच पाहिजे यावर कार्यकर्ते ठाम आहेत. भाजपचे
संभाव्य उमेदवार म्हणून धनंजय महाडिक, शौमिका महाडिक आणि समरजितसिंह घाटगे यांची नावे घेतली जातात.
पक्षाचा निर्णय कार्यकर्त्यांना मान्य
खा. धनंजय महाडिक यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास लढायला तयार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. शौमिका महाडिक यांची लोकसभा किंवा कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे सांगितले जाते. समरजितसिंह घाटगे यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत असले तरी ते मात्र कागलसाठीच आग्रही असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लोकसभेला भाजपला एक जागा हवी आहे. संभाव्य उमेदवारही आहेत. मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, अशा भूमिकेत कार्यकर्ते आहेत.