राज्यात कोटींवर कुणबी दाखले निघणार? | पुढारी

राज्यात कोटींवर कुणबी दाखले निघणार?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सर्वत्रच कुणबीच्या स्पष्ट नोंदी आढळून येत आहेत. या नोंदी सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे येत्या काही वर्षांत राज्यात कुणबीचे कोटींवर जातीचे दाखले निघण्याची शक्यता आहे.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील महसूल विभागाच्या सर्व अभिलेख (रेकॉर्ड), कारागृह, दुय्यम निबंधक, राज्य उत्पादन शुल्क, जन्म-मृत्यू नोंदणी आदींचे सर्व अभिलेखे तपासून त्यातील नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. या शोध मोहिमेत राज्यात आतापर्यंत 35 लाखांवर नोंदी आढळून आल्या आहेत.

यापूर्वी नोंद आढळून येत नाही, अशी निकाली समज देण्याचे प्रमाण अधिक होते. आता मात्र थेट नोंदीच आढळून आल्या आहेत. त्याही आता संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याने अनेकदा भाऊबंदकी, नात्यातील वादामुळे एकमेकांना उपलब्ध होत नसलेल्या या नोंदी आता सहजपणे मिळणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या सापडलेल्या नोंदीचा 35 लाखांवर आहेत. त्यापैकी दहा लाख नोंदीचा विचार केला तरी येत्या चार ते पाच वर्षांत किमान कोटींवर कुणबी प्रमाणपत्रे निघणार आहेत.

आढळून आलेल्या नोंदी संकेतस्थळावर गावनिहाय, शहरनिहाय उपलब्ध असतील. त्यामुळे नागरिकांना आपल्याशी संबंधित नोंदी सहजपणे पाहता येतील. नोंद आढळून आली तर त्याची नक्कल प्राप्त करून घेतली जाईल. त्यामुळे कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेतील मूळ अडथळा दूर होणार आहे. या शोध मोहिमेंतर्गत आढळून आलेल्या नोंदी पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार असल्याने दाखल्यांसाठी अडवणूक होणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे.

असा आहे ठोकताळा

शोधलेल्या नोंदी 1967 पूर्वीच्या आहेत. ज्यांची नोंद आढळली, त्यांचा अगदी 1967 चा जन्म असला तरी आज त्यांचे वय 56 आहे. त्यांची मुले, तसेच नातवंडे अशी कमाल संख्या जरी दोन इतकी धरली, तसेच ज्यांची नोंद आहे, त्यांची सख्खा भाऊ, सख्खी बहीण, चुलतभाऊ, चुलत बहीण, सख्ख्या भावाची मुले, चुलतभावांची मुले यांनाही या नोंदीचा लाभ होणार आहे. आजोबा – पणजोबा यांच्या नोंदी असतील तर रक्त्याच्या नात्यातील लोकांची ही संख्या आणखी वाढणार आहे. यामुळे एका नोंदीपासून आठ-दहाजणांना कुणबी प्रमाणपत्र सहजपणे उपलब्ध होते.

Back to top button